नावीन्यपूर्ण संशोधन! बॉक्साईट खाणीच्या दगडातील बॅक्टेरियापासून मदर बोर्डची विल्हेवाट
By राम शिनगारे | Published: January 6, 2024 12:50 PM2024-01-06T12:50:27+5:302024-01-06T12:55:01+5:30
पंधरा वर्षांपासून संशोधन : केंद्र शासनाचे संशोधनाच्या व्यावसायिक वापरासाठी प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : बॉक्साईटच्या खाणीतील दगडांमधील बॅक्टेरियापासून संगणक, मोबाईल, चार्जर, टीव्ही, रिमोटसह इतर विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये असलेल्या मदर बोर्ड म्हणजेच प्रिटेंड सर्किट बोर्डची (पीसीबी) पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याचे संशोधन विवेकानंद महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागात केले आहे. या संशोधनाचा व्यावसायिक वापर व पेटंटसाठी केंद्र शासनाच्या 'बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट कौन्सिल' म्हणजेच बायरॅक संस्थेने पुढाकार घेतल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. नितीन अधापुरे यांनी दिली.
प्रत्येक शहरात कचरा व्यवस्थापन ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन केले जात आहे. प्रत्येकाजवळ असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील मदर बोर्ड कॉपर, निकेल लेड, टिन, ॲल्युमिनियम, सोने-चांदीसह इतर धातूंच्या मिश्रणातून बनविले जातात. विविध धातू असल्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे कठीण जाते. अशा मदर बोर्डची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी डॉ. नितीन अधापुरे हे मागील २००८ पासून संशोधन करीत आहेत. यासाठी त्यांना ज्येष्ठ मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. अरविंद देशमुख यांचे सहकार्य मिळत आहे.
या संशोधनाला व्यापक स्वरूप २०१८-१९ मध्ये मिळाले. डॉ. अधापुरे यांनी 'बायरॅक' संस्थेकडे संशोधनाच्या 'स्केल अप'साठी प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव 'बायरॅक'ने मंजूर करीत २७ लाख ५० हजार रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला. त्यातून सुरुवातीला १० लिटर नंतर १०० लिटरच्या भांड्यामध्ये मदर बोर्डची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यात आली. त्यासाठी अमेनियम सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आदी रसायनाच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया केली. त्याचवेळी कर्नाटकातील चित्रदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील बॉक्साईट खाणीतून दगड आणले. त्यातील बॅक्टेरियाच्या प्रजाती पुण्यातील आगरकर इन्स्टिट्यूटमध्ये तपासून घेतल्या. या तपासलेल्या बॅक्टेरियांची वाढ केली. वाढलेले बॅक्टेरिया १०० लिटरच्या भांड्यात सोडून, त्यापासून मदर बोर्डमधील धातू विरघळविण्याची प्रक्रिया यशस्वी केल्याचेही डॉ. अधापुरे यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे यांच्यासह संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाने सहकार्य केले.
मदरबोर्डची जाळून केली जाते विल्हेवाट
मदर बोर्डची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याची प्रचलित पद्धती विकसित झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी मदर बोर्ड जाळून टाकतात. जळालेल्या मदरबोर्डमधील सर्व धातू एकत्र होऊन गट्टू तयार होतो. हा गट्टू परदेशात मोठ्या किमतीमध्ये विकण्यात येतात. विशेषत : बेल्जियममध्ये याविषयीचे तंत्रज्ञान अधिक प्रगत असल्यामुळे त्याठिकाणी गट्टू पाठवितात. त्याठिकाणी सर्व धातू वेगवेगळे करून पुन्हा वापरात आणले जातात.
व्यावसायिक वापरासाठी बोलणी
२००८ पासून मदर बोर्डची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी संशोधन सुरू आहे. बायरॅकच्या मदतीमुळे त्यात मोठी मजल मारता आली. आता बायरॅक संस्थाच या संशोधनाचे महाविद्यालयाच्या नावाने पेटंट फाईल करीत असून, त्याच्या व्यावसायिक वापरासाठी विविध उद्योगांसोबत बोलणी सुरू आहे.
- डॉ. नितीन अधापुरे, विभागप्रमुख, बायोटेक्नॉलॉजी व मायक्रोबायोलॉजी विभाग, विवेकानंद महाविद्यालय