वैजापुरातील इंग्लिश शाळांची चौकशी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:42 PM2019-01-12T22:42:30+5:302019-01-12T22:42:45+5:30
आठ शाळांना नोटिसा : सीबीएसईची मान्यता नसताना विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट
वैजापूर : सीबीएसईची मान्यता नसताना विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीवरुन पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने वैजापूर शहरातील नामांकित इंग्लिश शाळांची चौकशी सुरु केली असून आठ शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
परवानगी नसताना जाहिरात करुन विद्यार्थ्यांचे प्रवेश कोणत्या आधारावर केले, याचा खुलासा या शाळांना द्यावा लागणार आहे. अनेक शाळांनी अॅफिलेशनसाठी केवळ प्रस्ताव दिलेला असतानाही प्रवेश केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
वैजापूर शहरात इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा अलिकडच्या काळात सुरु झाल्या असून विद्यार्थी व पालकांना सीबीएसई अभ्यासक्रमाच्या नावावर संभ्रमित केले जात आहे. पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करुन सीबीएसईच्या ऐवजी सर्वसाधारण अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. याबाबत भाजपचे सुधाकर डगळे यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली होती. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने चौकशी करुन दोषी संस्था चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.होती. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी आर. जी. दिवेकर यांच्या आदेशाने शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत वैजापूर शहरातील देवगिरी ग्लोबल अॅकडमी, छत्रपती इंटरनॅशनल, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, फादर जॅकवेअर मेमोरियल इंग्लिश स्कुल, होली एंजेल्स इंग्लिश स्कूल, आरोहण अॅकडमी या शाळांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये फादर जॅकवेअर ही शाळा अद्याप सुरु झाली नाही. राजमाता जिजाऊ शाळा राज्य शासनाने प्रमाणित केलेले अभ्यासक्रम राबवते. आरोहण अॅकडमीला सीबीएसईची संलग्नता आहे. पण या शाळेत पहिली ते पाचवीच्या वर्गाला बालभारतीचा अभ्यासक्रम शिकवला जात नाही. होली एंजेल्स व पब्लिक स्कूलला प्रस्तावित सीबीएसई स्कूल म्हणून मान्यता आहे. परंतु या शाळांना अद्याप सीबीएसई बोर्डाची संलग्नता मिळालेली नाही. या शाळांनीसुद्धा इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांना बालभारतीचा अभ्यासक्रम राबवणे आवश्यक आहे. देवगिरी ग्लोबल व छत्रपती इंटरनॅशनल या शाळांना शासनाची मान्यता आहे. त्यामुळे शासनाने प्रमाणित केलेले अभ्यासक्रम राबवणे आवश्यक असताना या शाळा सीबीएसईच्या धर्तीवर खासगी प्रकाशनाची पुस्तके वापरत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे या सर्वच शाळांना शिक्षण विभागाने नोटीस बजावली असून खुलासा सादर करण्याचे आदेश संस्थाचालकांना दिले आहेत.