तुकाराम मुंढेंकडून चौकशी सुरू
By Admin | Published: July 13, 2017 01:04 AM2017-07-13T01:04:00+5:302017-07-13T01:05:08+5:30
औरंगाबाद : महापालिकेत २०१०-१४ या चार वर्षांच्या कालावधीत लाड समितीच्या माध्यमातून २४० कर्मचाऱ्यांचा नोकरभरती घोटाळा यापूर्वीच उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेत २०१०-१४ या चार वर्षांच्या कालावधीत लाड समितीच्या माध्यमातून २४० कर्मचाऱ्यांचा नोकरभरती घोटाळा यापूर्वीच उघडकीस आला आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने खास ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली असून, बुधवारी त्यांनी महापालिकेत येऊन नोकरभरती घोटाळ्याची चौकशी सुरू केली. मुंढे यांच्या चौकशीमुळे महापालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
महापालिकेत सफाई मजूर म्हणून काम करणाऱ्यांना आपल्या वारसाला नोकरीवर लावण्याची संधी लाड समितीने दिली आहे. लाड समितीचे नियम आणि निकष धाब्यावर बसवून तब्बल २४० जणांची बॅकडोअरने एंट्री केल्याची बाब २०१४ मध्ये उघडकीस आली. या नोकरभरती घोटाळ्याची मनपाकडून सखोल चौकशी करण्यात आली. यासाठी मुख्य लेखापरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नेमण्यात आली होती. समितीने आपला अहवाल तत्कालीन आयुक्तांना सादर केला. आयुक्तांनी तो अहवाल राज्य शासनास पाठविला. दरम्यान, या नोकरभरती घोटाळ्यावर विधानसभेत तारांकित प्रश्नही करण्यात आला होता. शासनाने यावर आणखी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. चौकशी अधिकारी म्हणून नंतर शासनाकडून मुंबई महापालिकेचे तत्कालीन आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंढे यांच्याकडील कामाचा व्याप अधिक असल्याने त्यांच्याकडून चौकशीस बराच विलंब होत होता. शासनाने दोन ते तीन वेळेस मुंढे यांना रिमार्इंडर पाठविले. शेवटी बुधवारी दुपारी १ वाजता मुंढे आपल्या ताफ्यासह महापालिकेत दाखल झाले.
त्यांच्या आगमनापूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी एकच गर्दी केली होती. हे दृश्य पाहून मुंढे यांनी आश्चर्य व्यक्त केले. मनपाचे उपायुक्त अय्युब खान यांच्याकडे विचारणा करण्यात आली की, एवढी गर्दी कशी काय...त्यानंतर मुंढे यांनी थेट आयुक्त डी. एम. मुगळीकर यांचे केबीन गाठले. तेथे अगोदरच त्यांचे स्वीय सहायक आणि काही अधिकारी वाट पाहत होते.
ताबडतोब कामाला सुरुवात
तुकाराम मुंढे येण्यापूर्वीच मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाड समितीच्या घोटाळ्यासंदर्भातील प्रत्येक फाईल आयुक्तांच्या दालनात ठेवली होती. मुख्य फाईलसह इतर सर्व फायलींची अत्यंत बारकाईने त्यांनी पाहणी केली. दुपारी ३ वाजेपर्यंत फायली पाहून ते रवाना झाले.