४१९ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव; मास कॉपीमध्ये कुलगुरू स्वतः घेणार सुनावणी
By राम शिनगारे | Published: November 4, 2023 06:08 PM2023-11-04T18:08:30+5:302023-11-04T18:10:43+5:30
शेंद्र्यातील महाविद्यालयातील प्रकार; परीक्षा मंडळाच्या ठरावानंतर कुलगुरू घेणार सुनावणी
छत्रपती संभाजीनगर : एप्रिल महिन्यात शेंद्रा येथील एका महाविद्यालयात ३०० ते ५०० रुपयांत परीक्षा झालेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी देत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्या केंद्रावर परीक्षा दिलेल्या दोन महाविद्यालयांतील ४१९ विद्यार्थ्यांच्या चार विषयांचा निकाल मास कॉपीमुळे राखीव ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणातील सर्वच विद्यार्थ्यांची सुनावणी स्वत: कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे शनिवारी घेणार आहेत. त्यासाठी पोलिस बंदोबस्तही मागविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेंद्रा येथील वाल्मिकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात ४ एप्रिल २०२३ रोजी गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. एका विद्यार्थिनीने परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची पाने काेरे ठेवण्यास सांगण्यात येत असून, त्या उत्तरपत्रिका ३०० ते ५०० रुपयांत सायंकाळी पुन्हा लिहिण्यास दिल्या जात असल्याचा दावा व्हिडीओद्वारे केला होता. त्यामुळे हे प्रकरण राज्यभरात गाजले. कुलगुरूंनी चौकशीसाठी अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राम चव्हाण आणि डॉ. बी. एन. डोळे यांची समिती नेमली. या समितीने भेट देत संबंधित विद्यार्थिनीचा दावा फोल ठरवला; मात्र, परीक्षेत गैरप्रकार होत असल्यामुळे परीक्षा केंद्र रद्द करण्यासह इतर पाच सूचना केल्या होत्या. त्यात पूर्वीच्या पेपरमध्ये मास कॉपीचा प्रकार झालेला आहे का, हे तपासूनच निकाल जाहीर करण्याची सूचना होती. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत एक ठराव घेण्यात आला. त्यानुसार या प्रकरणातील प्राचार्य, परीक्षा केंद्र प्रमुख, प्राध्यापक आणि ४१९ परीक्षार्थींना परीक्षा व मूल्यमापन मंडळासमोर सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या महाविद्यालयातील विद्यार्थी
वादग्रस्त ठरलेल्या परीक्षा केंद्रात पीपल्स कॉलेज ऑफ फाॅरेन्सिक सायन्स ॲण्ड सायबर सेक्युरिटी, शेंद्रा आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, शेंद्रा या दोन महाविद्यालयांतील ४१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात बी.एस्सी संगणकशास्त्राचे १९, बी.एस्सी आयटी ४, बीसीए मॅनेजमेंटचे १०, बीबीए ४५ आणि बी.एस्सी फाॅरेन्सिक सायन्सच्या ३४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तीन प्राध्यापकांनी तपासले वर-वर पेपर
मास कॉपीसारख्या गंभीर प्रकारानंतरही न्याय सहायक जीवशास्त्र या विषयाच्या जवळपास ३५०-४०० उत्तरपत्रिका अत्यंत कमी कालावधीमध्ये वर-वर पाहून १-२ तासांत तपासून अहवाल सादर केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. या विषयातील सहयोगी प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिका तपासण्याची विनंती करणारे पत्रच तपासणाऱ्या तीन प्राध्यापकांनी परीक्षा संचालकांना दिले. याविषयी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.