उठबशा प्रकरणाचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर!
By Admin | Published: August 12, 2015 12:41 AM2015-08-12T00:41:19+5:302015-08-12T00:54:59+5:30
जालना: जिल्ह्यासह राज्यभर गाजलेल्या जालन्यातील उठबशा प्रकरणाचा तपास पूर्ण करून अहवाल औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक
जालना: जिल्ह्यासह राज्यभर गाजलेल्या जालन्यातील उठबशा प्रकरणाचा तपास पूर्ण करून अहवाल औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती चौकशी अधिकारी अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी दिली.
येथील नूतनवसाहत भागातील रेल्वे उड्डाणपुलाखाली अतिक्रमण करून स्थापन केलेल्या हनुमान मूर्ती हटविताना तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी व्हिडिओ शुटींग घेतली होती. त्यातील चित्रिकरणाच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम व त्यांच्या पथकाने सरस्वती कॉलनी येथील सतीश गुलाब वाघ ( वय ३० ) व ओमप्रकाश आढे या दोन तरुणांना ३०० उठबशा काढण्याची शिक्षा देवून त्यांना मारहाणही करण्यात आली होती.
त्याचा या दोन्ही युवकांच्या मूत्रपिंडावर परिणाम झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील वेगवेगळ्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या संबंधी सर्वप्रथम लोकमत ने करण्यात १४ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताने राज्यभर पोलिस प्रशासना विरोधात रोष व्यक्त झाल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी नांदेड दौऱ्यात असताना या वृत्ताची गंभीर दखल घेत प्रकरणाची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे सोपविली होती.
दरम्यानच्या काळात औरंगाबाद पोलिसांनीही संबंधित डॉक्टरांचा एमएलसी अहवालावरून वाघ व आढे या तरूणांचा जबाब नोंदवून अहवाल कारवाईसाठी कदीम जालना पोलिसांकडे पाठविला. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने तो अहवाल कदीम जालना पोलिसांनी अप्पर पोलीस अधीक्षक माकणीकर यांच्याकडे पाठविला होता. या अहवालानुसार कदीम जालना पोलिसांनीही पिडित तरुणांचे जबाब नोंदविले होते. तसेच चौकशी अन्य काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ही जबाब नोंदविण्यात आले. या प्रकरणाची सर्व चौकशी पूर्ण करून अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे -पाटील यांना पाठविण्यात आला. (प्रतिनिधी)