वैजापूरच्या ‘त्या’ हाॅस्पिटलची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:04 AM2021-04-16T04:04:31+5:302021-04-16T04:04:31+5:30
वैजापूर : शहरातील लाडगाव रोडवरील आधार हाॅस्पिटलमध्ये विनापरवाना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. १२ ...
वैजापूर : शहरातील लाडगाव रोडवरील आधार हाॅस्पिटलमध्ये विनापरवाना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. १२ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातून आलेल्या एक परजिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी दगावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याच दिवशी तालुक्यातील चांडगावातील एक महिला कोरोनासंबंधी उपचार घेताना मयत झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत या हॉस्पिटलची चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत तत्काळ अहवाल मागवला आहे.
चांडगावातील महिलेस उपचारासाठी आधार हॉस्पिटलमध्ये ९ एप्रिलला दाखल करण्यात आले होते; पण उपचारादरम्यान १२ एप्रिलला संबंधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर काही लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याच दिवशी अन्य एका रुग्णाचा या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याने शहरातील खासगी रुग्णालयात विनापरवाना कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आधार हाॅस्पिटलला प्रशासनाने यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खासगी दवाखाने बेकायदा कोरोना रुग्णांवर उपचार करून त्यांची लूट करत असल्याच्या तक्रारी आहेत. इतरही काही खासगी दवाखान्यात कोरोना रुग्णांवर बेकायदा उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळत असल्याचे प्रकार पुढे येत आहे. दोन दिवसांपूर्वी विनापरवाना कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या देवगिरी हाॅस्पिटलच्या डॉ. गणेश अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र तेव्हापासून संबंधित डॉक्टर फरार आहे. आरोग्य विभागाने वैजापूरकडे आपला मोर्चा वळवल्याने गैरप्रकार करणाऱ्या मेडिकल व दवाखाने चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, दोन मेडिकलमध्ये अनियमितता आढळल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या.
--- तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथक ----
वैजापूरच्या आधार हाॅस्पिटलची गुरुवारी तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या पथकाने तपासणी केली. यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागनाथ इंदोलीकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे यांचा समावेश होता. या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्या असून, संबंधित अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांनी दिली.