आंतरवासिता डाॅक्टर मागण्यांवर ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:02 AM2021-05-08T04:02:56+5:302021-05-08T04:02:56+5:30
औरंगाबाद : बृहन्मुंबई, पुणे महापालिकेकडून आंतरवासिता डॉक्टरांना कोरोना भत्ता दिला जात असताना घाटीत काम करणाऱ्या १६० आंतरवासिता डाॅक्टरांनाही ३९ ...
औरंगाबाद : बृहन्मुंबई, पुणे महापालिकेकडून आंतरवासिता डॉक्टरांना कोरोना भत्ता दिला जात असताना घाटीत काम करणाऱ्या १६० आंतरवासिता डाॅक्टरांनाही ३९ हजार कोरोना भत्ता आणि ११ हजार विद्यावेतन असे ५० हजार रुपये दरमहा मिळावे, अशी मागणी इंटर्न डाॅक्टरांच्या ‘अस्मी’ संघटनेनेही केली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचीही त्यांनी भेट घेतली. तसेच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनीही यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
यासंदर्भात ‘अस्मी’चे घाटी रुग्णालयातील अध्यक्ष डॉ. राम बागल म्हणाले, इंटर्न रुग्णसेवेत जीवाची जोखीम घेऊन काम करत आहेत. त्यांच्याही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून, ५० लाख रुपयांचे विमा कवच याही डाॅक्टरांना मिळावे. तसेच ड्युटीदरम्यान राहण्याची व्यवस्था व त्यानंतर क्वारंटाईन सुविधा देण्यात यावी, अशी मागणी ‘अस्मी’ने केलेली असून, कोरोना भत्ता मिळावा, ही प्रमुख मागणी आहे. यासंदर्भात नुकतेच आंदोलन केले. अद्याप काहीही हालचाली नाहीत. जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी एप्रिलपासून कोरोना मानधन मिळावे, न मिळाल्यास सध्या सुरू असलेले कामबंद सुरूच राहील व लवकरच पुन्हा मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. तर अधिष्ठातांनी जिल्हाधिकारी यांनी इंटर्न डाॅक्टरांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने पाहून मान्य करण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.