नामविस्तार दिन कार्यक्रमासाठी एकच मंच स्थापण्याचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:32 AM2018-01-07T00:32:29+5:302018-01-07T00:32:32+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार वर्धापन दिन समारंभासाठी यंदा एकच व्यासपीठ ठेवण्यासाठी आंबेडकरी तरुण आग्रही आहेत. यासाठी विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांच्या प्रमुख नेत्यांना एकाच व्यासपीठावर येण्यासाठी साकडे घालण्यात येणार आहे. ‘एक विचार आणि एक मंच’ या विचाराने नामांतर चळवळीतील शहिदांना अभिवादन करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार वर्धापन दिन समारंभासाठी यंदा एकच व्यासपीठ ठेवण्यासाठी आंबेडकरी तरुण आग्रही आहेत. यासाठी विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांच्या प्रमुख नेत्यांना एकाच व्यासपीठावर येण्यासाठी साकडे घालण्यात येणार आहे. ‘एक विचार आणि एक मंच’ या विचाराने नामांतर चळवळीतील शहिदांना अभिवादन करण्यात येणार आहे.
आंबेडकर चळवळीतील सर्व तरुणांची बैठक शनिवारी दुपारी सुभेदारी विश्रामगृहाच्या हिरवळीवर पार पडली. विद्यापीठाचा नामविस्तार वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आयोजित या बैठकीमध्ये ‘एक विचार अन् एक मंच’ ही संकल्पना समोर आली. चर्चेनंतर या संकल्पनेस उपस्थितांनी सर्व पक्ष-संघटनांच्या स्थानिक नेत्यांनीही सहमती दर्शविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यापासून प्रत्येक वर्षी विविध पक्ष, संघटना आपापले स्वतंत्र व्यासपीठ उभारत असतात. कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी तरुणांनी समाजाच्या एकीवर भर दिला आहे.
यानिमित्ताने गट-तटामध्ये विभागलेला समाज व तरुणाई यांच्यामधील संवादाचे नवे पर्व सुरू होईल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला. नागसेनवन परिसर व विद्यापीठ परिसरात विविध उपक्रम राबविणाºया सर्व गटाच्या प्रमुख पदाधिकाºयांशी आगामी काळात संपर्क साधून ‘एक विचार-एक मंच’ या संकल्पनेवर एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. अनेक पक्षाच्या प्रमुखांबरोबरच, पदाधिकारी, नेत्यांनी यास सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. सभेसाठी लागणारा सर्व खर्च तरुणांच्या आर्थिक सहभागातून करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची वर्गणी जमा करण्यात येणार नसल्यााचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या संकल्पनेची यंदा सुरुवातच असल्याने ‘जो येईल त्याच्यासह जो नाही येणार त्याच्याशिवाय’ या पद्धतीने ‘एक विचार अन् एक मंच’ ही संकल्पना पूर्ण करण्यात येणार आहे. बैठकीस सुमारे ३०० आंबेडकरी तरुणांची उपस्थिती होती.