गाढवांच्या मदतीने केली खड्ड्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 06:28 PM2018-12-14T18:28:32+5:302018-12-14T18:28:48+5:30
सरपंच व ग्रामसेवक यांना खड्डे पाहणीचे निमंत्रण देवूनही ते न आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शुक्रवारी चक्क दोन गाढवांना घेवून रस्त्यावरील खडड््याची पाहणी करीत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
वाळूज महानगर : रांजणगावातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे स्थानिक ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. सरपंच व ग्रामसेवक यांना खड्डे पाहणीचे निमंत्रण देवूनही ते न आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शुक्रवारी चक्क दोन गाढवांना घेवून रस्त्यावरील खडड््याची पाहणी करीत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
रांजणगाव ग्रामपंचायत कार्यालय ते रांजणगाव फाटा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्ता उखडल्याने जागोजागी खड्डे पडले असून, खडी वर आली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अपघाताच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांना वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी शिवसेनेतर्फे विभाग प्रमुख कैलास हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करुन रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. तेव्हा ग्रामपंचायतीने गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन दिले होते.
ग्रामपंचायतीला आश्वासनाचा विसर पडल्याने ११ सप्टेंबर रोजी पुन्हा शिवसेनेने खड्डे मोजणी आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. साधारणत: दीड किलोमीटर रस्त्यावर जवळपास दीड हजार खड्डे पडल्याचे समोर आले होते. अर्ज, विनंत्या,आंदोलन करुनही ग्रामपंचायत खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हिवाळे यांनी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करुन सरपंच मोहिनीराज धनवटे व ग्रामसेवक एस.एन. रोहकले यांना प्रत्यक्ष खड्डे पाहणी करण्याचे निमंत्रण दिले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजेची वेळ देवूनही सरपंच व ग्रामसेवक खड्डे पाहणीसाठी आले नाहीत. तासभर प्रतीक्षा करुन अखेर शिवसेना पदाधिकाºयांनी दोन गाढवांना सोबत घेवून रस्त्यावरील खडड््याची पाहणी करीत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विभाग प्रमुख कैलास हिवाळे, बबन पठाडे, माजी उपसरपंच बाबासाहेब बटुळे, शंकर सुरासे, जावेद शेख, प्रदीप सवई, भगवान साळुंके, गणेश काकडे, राजेश उणवने, विशाल काळे, रामेश्वर कबाडे, योगेश म्हस्के आदींची उपस्थिती होती.
सरपंचासह ग्रा.पं. सदस्य सहलीवर ..
रांजणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची १७ डिसेंबरला निवडणूक आहे. विद्यमान प्रभारी सरपंचासह काही ग्रा.पं. सदस्य आठवडाभरापासून अज्ञात स्थळी सहलीवर गेले आहेत. कारभारीच गैरहजर असल्याने ग्रामपंचायतीच्या विविध प्रमाणपत्रासाठी सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.