दोन महिन्यांनी पाहणी होतेय, मदत लवकर मिळेल तेवढे पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:03 AM2020-12-22T04:03:56+5:302020-12-22T04:03:56+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यात सरत्या वर्षातील अतिवृष्टीमुळे ३६ लाख शेतकऱ्यांनी २६ लाख हेक्टरवर पेरलेले पीक वाया गेले. त्याला दोन महिने ...

The inspection is done in two months, see if you can get help soon | दोन महिन्यांनी पाहणी होतेय, मदत लवकर मिळेल तेवढे पहा

दोन महिन्यांनी पाहणी होतेय, मदत लवकर मिळेल तेवढे पहा

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यात सरत्या वर्षातील अतिवृष्टीमुळे ३६ लाख शेतकऱ्यांनी २६ लाख हेक्टरवर पेरलेले पीक वाया गेले. त्याला दोन महिने झाल्यानंतर केंद्रीय पथकाने औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील पाहणी करून नुकसानीचा विभागातील अंदाज बांधण्यासाठी सोमवारी सकाळी ८ वाजेपासून पाहणी दौरा केला. दोन महिन्यांनी पाहणी होतेय, आता मदत लवकर मिळेल तेवढे पहा, असा संताप औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

दौऱ्यापूर्वी रविवारी नुकसानीचे पंचनामे, छायाचित्रे, व्हिडिओ शूटींग पथकातील अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले. त्यावरून नुकसान किती झाले, याचा अंदाज पथकाला आला.

तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील गाजीपूर, निलजगांव, शेकटा व गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव, जाखमाथा आणि वरखेड येथील शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन केंद्रीय पथकप्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंता, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल यांनी सोमवारी पाहणी केली. या वेळी पथकातील अधिकाऱ्यांनी निपाणीतील शेतकरी नंदू भालेकर, पांढरी पिंपळगाव येथील शेतकरी विठ्ठल बहुरे, विपीन कासलीवाल, संदीप दुधाळ, दिलीप भालेकर, सखाराम पुंगळे, लालू भालेकर यांच्याशी संवाद साधला. पाहणीदरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची उपस्थिती होती.

वीजपुरवठ्याबाबत तक्रारी मांडल्या

वीजपुरवठा रात्री ११ वाजता होतो. तोपर्यंत शेतकऱ्यांना जागरण करून पाणीपुरवठा करावा लागतो. सकाळी ७ वाजेपर्यंत वीज असते. तोपर्यंत शेतकऱ्यांना जागरण करावे लागते. या सगळ्या दृष्टचक्रामुळे शेतकऱ्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याच्या व्यथा पथकासमोर मांडल्या.

नुकसानीची वस्तुस्थिती मांडली

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, पथकासमोर पंचनामे, व्हिडिओ शूटींगच्या माध्यमातून नुकसानीची वस्तुस्थिती मांडली. पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, अद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कापणी करता न आल्याने पिकांचे नुकसान झाले. केंद्राकडून योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केली.

Web Title: The inspection is done in two months, see if you can get help soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.