विमानतळावर प्रत्येक वाहनाची तपासणी; पंतप्रधानांच्या आगमनापासून तर प्रस्थानापर्यंत विशेष दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 02:16 PM2019-09-07T14:16:31+5:302019-09-07T14:18:25+5:30
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाबरोबर (सीआयएसएफ), पोलिसांकडून परिसरावर करडी नजर ठेवली जात आहे.
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बशोधक, नाशक पथक, श्वान पथकाकडून खाजगी वाहनांबरोबर शासकीय वाहनांचीही तपासणी केली जात आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाबरोबर (सीआयएसएफ), पोलिसांकडून परिसरावर करडी नजर ठेवली जात आहे.
चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला पूर्वी मिळालेल्या दौऱ्यानुसार शुक्रवारी सर्व तयारीचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला. कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणती जबाबदारी पार पाडायची आहे, त्याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले. चिकलठाणा विमानतळावरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. जालना रोडवरील प्रवेशद्वारापासून तर विमानतळाच्या इमारतीपर्यंत जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
विमानतळावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ‘सीआयएसएफ ’कडून तपासणी केली जात आहे. कोणतेही कारण नसताना विमानतळावर प्रवेश करणाऱ्यांना रोखले जात आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात राहणाऱ्या शासकीय, पोलिसांच्या वाहनांचीही बॉम्बशोधक, नाशक पथकांकडून तपासणी करण्यात आली. सुरक्षा व्यवस्था शनिवारी आणखी कडक केली जाणार आहे.
चार हेलिकॉप्टर सज्ज
मुंबई येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष विमानाने दुपारी १.४० वाजता विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने शेंद्रा एमआयडीसी येथील कार्यक्रमासाठी रवाना होतील. यासाठी विमानतळावर चार हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले आहेत. येथील कार्यक्रम संपल्यानंतर ते दुपारी ३.४५ वाजता हेलिकॉप्टरने विमानतळाकडे रवाना होतील. यामध्ये बदलही होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
मोबाईल नेण्यास मज्जाव
विमानतळावर प्रवेश करणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून देखरेख ठेवली जात आहे. विमानतळाच्या इमारतीत प्रवेश करताना शासकीय अधिकाऱ्यांनाही मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मोबाईल हे विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे.
विमानतळालगत रहिवाशांची झाडाझडती
सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळालगत आणि सुरक्षा भिंतीच्या परिसरातील रहिवाशांची झाडाझडती घेण्यात आली. नागरिकांच्या आधार कार्डची तपासणी करण्यावर भर देण्यात आला. शिवाय विमानतळाच्या चारही बाजूंनी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
कसे आहे पंतप्रधानांचे विशेष विमान?
पंतप्रधान जेव्हा जेव्हा दौऱ्यावर असतात, तेव्हा ते खास विमानाने प्रवास करतात. या विमानात अनेक वैशिष्ट्ये आहेत. पंतप्रधान उड्डाणदरम्यान कोणत्याही वेळी कुठेही संपर्क साधू शकतात.विमान केवळ बुलेटप्रूफच नाही तर ग्रेनेड, रॉकेट आणि क्षेपणास्त्र प्रूफदेखील आहे. यात क्षेपणास्त्र आणि रडार जॅमरदेखील आहेत. त्याची संपूर्ण यंत्रणा इतकी मजबूत आहे की कोणताही हॅकर त्यास हॅक करू शकत नाही. जर विमानाला अनिश्चित काळासाठी हवेमध्ये राहायचे असेल तर त्याला हवेतही इंधन भरण्याची सुविधा आहे. पंतप्रधान हवाई मार्गाने प्रवास करतात तो मार्ग पूर्णपणे वायुदलाच्या निगराणीत असतो. विशेष विमानात प्रशिक्षित आणि अनुभवी पायलट असतात, जे कोणत्याही वेळी उड्डाणे करण्यासाठी खास तयार असतात.