साहित्य संमेलनासाठी समिती करणार नाशिकची पाहणी, दिल्लीचा पत्ता कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 01:57 PM2021-01-05T13:57:22+5:302021-01-05T14:05:42+5:30

Sahitya Sammelan ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे होणार याचा ८ जानेवारीला निर्णय होणार

Inspection of Nashik for Sahitya Sammelan, Delhi chance cut off | साहित्य संमेलनासाठी समिती करणार नाशिकची पाहणी, दिल्लीचा पत्ता कापला

साहित्य संमेलनासाठी समिती करणार नाशिकची पाहणी, दिल्लीचा पत्ता कापला

googlenewsNext
ठळक मुद्दे पहिल्यापासूनच नाशिकचे पारडे जड होते सरहद संस्थेने पुन्हा एकदा प्रस्तावाबाबतचे स्मरणपत्र पाठवले

औरंगाबाद : ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्थळ ठरविण्यासाठी रविवारी (दि. ३) मराठवाडा साहित्य परिषदेत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समिती नेमण्यात आली. ही समिती नाशिक येथे स्थळ निवडीसाठी भेट देईल, असा निर्णय झाला आहे. यावरूनच साहित्य महामंडळाने नाशिकचा प्रस्ताव स्वीकारून दिल्लीचा पत्ता कापल्याचे स्पष्ट झाले.

याविषयी अधिकृतपणे सांगण्यास साहित्य महामंडळाने नकार दिला. ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सार्वजनिक वाचनालय संस्था व लोकहितवादी मंडळ या नाशिक येथील दोन संस्था आणि दिल्ली येथील सरहद संस्था यांच्या निमंत्रणाचे प्रस्ताव साहित्य महामंडळाकडे आले होते. यापैकी पहिल्यापासूनच नाशिकचे पारडे जड होते आणि दिल्लीकडे कानाडोळा होता. त्यामुळे सरहद संस्थेने पुन्हा एकदा प्रस्तावाबाबतच्या स्मरणाचे पत्र साहित्य महामंडळाला धाडले होते. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक घेण्यात आली असून, यादरम्यान साहित्य संमेलन स्थळ निवड समिती सदस्यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

स्थळ निवड समिती ७ जानेवारी रोजी नाशिक येथे भेट देणार असून ८ जानेवारी रोजी या समितीची बैठक औरंगाबादेत होणार आहे. या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे व्हावे, याची शिफारस महामंडळास ही समिती करेल, असे सांगण्यात आले. प्रा. उषा तांबे (मुंबई), उज्ज्वला मेहेंदळे (मुंबई), प्रा. प्रतिभा सराफ (मुंबई), प्रा. मिलिंद जोशी (पुणे), प्रकाश पायगुडे (पुणे), सुनीताराजे पवार (पुणे), विलास मानेकर (नागपूर), प्रदीप दाते (वर्धा), गजानन नारे (नागपूर), कपूर वासनिक (छत्तीसगड) या महामंडळ सदस्यांची बैठकीला उपस्थिती होती. बैठकीदरम्यान डाॅ. काळुंखे यांनी महामंडळाचा २०१९- २० चा अहवाल सादर केला. तसेच २०२०- २१ च्या आर्थिक नियोजनाला मान्यताही देण्यात आली. तसेच महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कपूर वासनिक यांना कार्योत्तर मान्यता देण्यात आली असून अक्षरयात्रा संपादक मंडळासही मान्यता दिली गेली.

Web Title: Inspection of Nashik for Sahitya Sammelan, Delhi chance cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.