शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी
By | Published: December 9, 2020 04:00 AM2020-12-09T04:00:11+5:302020-12-09T04:00:11+5:30
औरंगाबाद : क्रांतीचौकात महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय ...
औरंगाबाद : क्रांतीचौकात महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. चौथऱ्यासह पुतळ्याची उंची सुमारे ५२ फूट असणार आहे. यात चौथरा ३१ फूट आणि पुतळा २१ फूट उंच असणार आहे.
मनपा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयात लोकप्रतिनिधी, माजी पदाधिकारी, नगरसेवकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व प्रस्तावित कामाच्या संकल्प आराखड्याच्या प्रतिकृतीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी खा. डॉ. भागवत कराड , आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, विकास जैन, राजू शिंदे, प्रमोद राठोड, सरिता बोर्डे, पृथ्वीराज पवार, विनोद पाटील, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, शिल्पकार दीपक थोपटे, आर्किटेक्ट धीरज देशमुख यांची उपस्थिती होती.
मान्यवरांनी प्रतिकृतीबाबत सूचना केल्या. घोड्याचा डावा पाय हवेत असावा, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या घोड्याचे अलंकार स्पष्ट दिसावेत, घोड्याच्या पायातील अंतर एक सारखे पाहिजे, या सूचना बागडे यांनी केल्या. पृथ्वीराज पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार उंच पाहिजे, ती वर करतांना वाटली पाहिजे, जंजाळ यांनी महाराजांचा पुतळा हा प्रतापगडावरील पुतळ्यासारखा असावा अशा सूचना केल्या. सर्व सूचनांचे पालन करून वेळेत काम पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आले.