नवीन महाविद्यालयांचे तपासणी अहवाल रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:00+5:302021-06-16T04:06:00+5:30
औरंगाबाद : नवीन विनाअनुदानित महाविद्यालये सुरू करण्यासाठी इरादापत्र मिळालेल्या ६५ पैकी ६३ महाविद्यालयांना अंतिम मान्यता देण्यासाठी विद्यापीठाने नेमलेल्या ३२ ...
औरंगाबाद : नवीन विनाअनुदानित महाविद्यालये सुरू करण्यासाठी इरादापत्र मिळालेल्या ६५ पैकी ६३ महाविद्यालयांना अंतिम मान्यता देण्यासाठी विद्यापीठाने नेमलेल्या ३२ समित्यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर सोमवारपर्यंत ४० तपासणी अहवाल सादर केले आहेत. तथापि, अजूनही २३ तपासणी अहवालांची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. यातील दोन विधी महाविद्यालयांना ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ची मान्यता मिळालेली नाही. त्यासंबंधी विद्यापीठाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. यासंदर्भात विद्यापीठ सूत्रांनी सांगितले की, येत्या गुरुवारी होणाऱ्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत प्राप्त तपासणी अहवालांची पडताळणी होईल. त्यामध्ये शासनाने निश्चित केलेल्या काही निकषांची त्रुटी राहिलेली असेल, तर त्याची पूर्तता करण्यासाठी महाविद्यालयांना काही दिवसांची संधी मिळेल. त्यानंतर पुढील दहा दिवसांत होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हे तपासणी अहवाल सादर करण्यात येतील व परिषदेच्या मान्यतेनंतर ते परिपूर्ण अहवाल शासनाकडे अंतिम मान्यतेस्तव सादर करण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात शासनाकडून ४९ नवीन विनाअनुदानित महाविद्यालयांना मंजुरी मिळाली, तर दुसऱ्या टप्प्यात १६ महाविद्यालयांना मंजुरी मिळाली होती. अंतिम मान्यतेबद्दल तपासणीसाठी पहिल्या टप्प्यातील महाविद्यालयांना ५ जून, तर दुसऱ्या टप्प्यातील महाविद्यालयांना १० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तपासणी अहवाल सादर करण्यासाठी १२ जूनपर्यंत ‘डेड लाईन’ निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार ४० तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित २३ महाविद्यालयांच्या तपासणीमध्ये समिती सदस्यांना आरोग्याच्या अडचणीला सामोरे जावे लागले. समित्यांमधील काही सदस्य कोरोना बाधित झाले होते, तर काहींच्या कुटुंबातील सदस्य बाधित असल्याने ते विलगीकरणात होते. त्यामुळे स्थळ पाहणी करण्यास विलंब झाल्याचे त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला कळविले आहे.
चौकट...........
१५ जूनपूर्वी तपासणी अहवाल अपेक्षित
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाने ६५ नवीन विनाअनुदानित महाविद्यालयांना इरादापत्र मंजूर केले आहे. चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी त्यांना शासनाची अंतिम मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने ३२ समित्या स्थापन केल्या होत्या. या समित्यांनी विद्यापीठाने दिलेल्या मसुद्याप्रमाणे महाविद्यालयांच्या ठिकाणी जाऊन पायाभूत सुविधांची खातरजमा केली. तेथील वर्गखोल्या, प्राचार्यांचा कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडांगण, प्रसाधनगृहांची तंतोतंत पाहणी केली असून चित्रीकरणासह अहवाल सादर केले आहेत. रखडलेले २३ तपासणी अहवाल १५ जूनपूर्वी विद्यापीठाला प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.