प्रेरणादायी क्रांती चौक ! १९८३ साली उभारण्यात आला होता शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 02:07 PM2022-02-19T14:07:38+5:302022-02-19T14:08:23+5:30
शिवजयंती विशेष: क्रांती चौकात २१ मे १९८३ रोजी मुंबईहून आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला होता.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शहरातील पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे २१ मे १९८३ रोजी क्रांती चौकात अनावरण झाले होते. शिवरायांच्या या पुतळ्याने ३५ वर्षे शहरवासीयांना प्रेरणा दिली. या पुतळ्याकडे पाहून प्रत्येकाच्या अंगात स्फूर्ती निर्माण होत असे. नवीन पुतळा बसविण्यासाठी मार्च २०१८ मध्ये जुना पुतळा सन्मानपूर्वक काढण्यात आला. आता त्या जागी छत्रपतींचा दुसरा नवीन अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या निमित्ताने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या पुतळा अनावरणाचा तो ऐतिहासिक क्षण आठवला.
पहिल्या पुतळ्यासाठी २१ वर्षाचा लढा
क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण १९८३ मध्ये झाले असले तरीही तो उभारण्यासाठी १९६२ पासून प्रयत्न सुरू होते. १९८१ मध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कार्य जि. प. व नगरपालिकेने संयुक्तपणे हाती घ्यावे, असे ठरले होते. ही पुतळा उभारण्यासाठीची पहिली बैठक ठरली.
पहिल्या समितीचे अध्यक्ष ठरले अलफखाँ
अश्वारुढ शिवछत्रपती सर्वपक्षीय पुतळा समितीची स्थापना १९८१ मध्ये करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष अलफखाँ हे होते. सचिव अरुण मुगदिया, समितीमध्ये केशवराव औताडे, साहेबराव पाटील डोणगावकर, प्रकाश मुगदिया, पृथ्वीराज पवार, अशोक शहा आदींचा समावेश होता.
पहिल्या पुतळ्याविषयी
१) मुंबईतील शिल्पकार एस.डी. साठे यांनी क्रांती चौकातील महाराजांचा पहिला अश्वारुढ पुतळा तयार केला.
२) शिवरायांचा आधीचा पुतळा १५ फूट उंच ५ फूट रुंदीचा होता.
३) मुंबईहून ट्रकने ९ मे १९८३ रोजी शहरात पुतळा आणण्यात आला.
४) २१ मे १९८३ रोजी अनावरण झाले होते.