माणुसकी हरवत चाललेल्या समाजात सुमित पंडित यांचा आशादायी आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 08:08 PM2017-12-11T20:08:01+5:302017-12-11T20:21:39+5:30
मुलगा मुलगी असे काहीच नाही, फक्त संस्कार आपण चांगले देत नाही’ अशा कीर्तनातून सुमित पंडित खेडे, तांडे, वस्त्यावरून जाऊन लोकांमध्ये स्त्रीभ्रुण हत्येविषयी जनजागर करीत आहेत. जटवाडा येथे राहणारे सुमित पंडित (२४) आणि त्यांची पत्नी पूजा हे जोडपे त्यांच्या समाजसेवेसाठी प्रसिद्ध आहे.
औरंगाबाद : ‘मुलगा मुलगी असे काहीच नाही, फक्त संस्कार आपण चांगले देत नाही’ अशा कीर्तनातून सुमित पंडित खेडे, तांडे, वस्त्यावरून जाऊन लोकांमध्ये स्त्रीभ्रुण हत्येविषयी जनजागर करीत आहेत. जटवाडा येथे राहणारे सुमित पंडित (२४) आणि त्यांची पत्नी पूजा हे जोडपे त्यांच्या समाजसेवेसाठी प्रसिद्ध आहे.
नाभिक काम करणारे सुमित पोटाला चिमटा काढून गोरगरीबांच्या मदतीला धावून जातात. घाटीमध्ये रात्री अपरात्री जेवण किंवा रक्त पोहचविणे असो, रस्त्यावरी बेवारस लोकांची स्वच्छता असो, गरजुंना औषधी पुरवणे, स्त्री-भ्रुण हत्येविराधातील अभियान किंवा खेडोपाड्यातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवणे असो, स्वखर्च आणि कर्जकाढून ते मदत करतात.
‘गरज असताना लोक आपल्याला मदत करत नाही, याचा अनेकदा अनुभव आला. घाटीत माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेस पत्नीला रक्ताची गरज होती. माझ्याकडे पैसे नव्हते. अक्षरश: रडूनही कोणी मदत केली नाही. तेव्हा ठरवले की, आपल्यावर जी पाळी आली ती इतरांवर येऊ नये’, असे सुमित यांनी सांगितले.
तेव्हापासून ते रक्तदान शिबीर आयोजित करतात. रक्तदान करणाऱ्याची एक महिना व २१ दिवस मोफत दाढी-कटिंग करून देतात. घाटीत गोरगरीबांना हे मोफत रक्त पोचविण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ते करतात. ‘शिबीर घेण्यासाठीही लोक जागा देत नाही. म्हणून माझ्या छोट्याशा दुकानातच रक्तदान शिबरी घेतो, असे ते सांगतात.
मळकटलेले कपडे आणि वाढलेले केस अशा अवतारात रस्त्यांवर बेवारस राहणाºया लोकांची दयनीय अवस्था सुमित यांना पाहावली जात नाही. दर महिन्याला ते अशा लोकांची मोफत दाढी-कटिंग करून त्यांना आंघोळ घालतात. त्यांना उपचारासाठी घाटीला घेऊन जातात. आतापर्यंत ४२ बेवारसांनी त्यांनी मदत केली आहे.
दाढी-कटिंगच्या कमाईतून ते दररोज तीनशे रुपये समाजसेवेसाठी बाजूला काढून ठेवतात. समाजसेवा करायला श्रीमंती नाही तर मन मोठे असावे लागते. ‘दुनिया में आकर कमाया खुब हिरे क्या मोती, मगर कफन जेब नहीं होती’ हे त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान. डॉ. अब्दुल कलामांचा आदर्श घेऊन निघालेल्या या अवलियाला कोणी सोबत येईल की नाही याची चिंता नाही. ‘मी करत राहणार’, एवढाच त्यांचा निश्चय आहे.
मुलीच्या वडिलांची मोफत दाढी
ज्या घरात मुलीचा जन्म झाला, तिच्या वडिलांची दोन महिने २१ दिवस मोफत दाढी करण्याचा अभिनय उपक्रम सुमित यांनी यावर्षी सुरू केला. मुलगी झालेल्या दाम्पत्यांच्या घरी जाऊन ते वडिलांचा शालश्रीफळ देऊन सत्कार, आईला साडीची भेट, मुलीला ड्रेस आणि जावळे मोफत काढून देतात. तसेच टपाल कार्यालयात ‘सुकन्या’ योजनेंतर्गत त्या मुलीच्या नावे खाते उघडून त्यात २८१ रुपयेदेखील भरतात. आतापर्यंत त्यांनी अशी ५२ खाते उघडली आहेत.