‘इसिस’पासून प्रेरणा घेऊन मोठ्या जीवितहानीचा कट रचणाऱ्या मुलाची रवानगी विशेष सुधारगृहात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:50 PM2022-05-19T12:50:36+5:302022-05-19T12:51:01+5:30
बालन्याय मंडळाचे आदेश, एटीएसने २०१९ मध्ये पकडले होते संशयित दहशतवादी
औरंगाबाद : इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेपासून प्रेरित होऊन शहरातील जलकुंभात अथवा धार्मिक कार्यक्रमातील प्रसाद, जेवणावळीत विष कालवून मोठ्या प्रमाणात जीवितहानी करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पकडलेल्या टोळीतील एका अल्पवयीन मुलावरील आरोप बालन्याय मंडळासमोर सिद्ध झाले. न्यायमंडळाने या मुलाला तीन वर्षे विशेष निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
‘इसिस’च्या विचाराने प्रेरित होऊन मुंब्रा आणि औरंगाबादेतील काही जणांनी २०१९ मध्ये उम्मत ए मोहम्मदिया या नावाचा ग्रुप तयार केला होता. या माध्यमातून त्यांनी विशिष्ट धर्मीयांच्या धार्मिक कार्यक्रमाचा प्रसाद, जेवण अथवा शहरातील जलकुंभाच्या पाण्यामध्ये विष मिसळून मोठी जीवितहानी करण्याचा कट रचल्याची गुप्त माहिती मिळाल्याने औरंगाबाद एटीएस पथकाने शहरातील आणि मुंब्रा येथील ९ तरुणांना अटक केली होती. स्फोटक पदार्थाचा वापर करून मुंबई, ठाणे आणि औरंगाबादेत दहशतवादी हल्ला करण्यासाठी त्यांनी या शहराची रेकीही केल्याचे तपासात समोर आले होते.
याप्रकरणी एटीएसने आरोपी मोहसीन सिराजउद्दीन खान, मजहर अब्दुल रशीद शेख, मोहम्मद तकी सिराजउद्दीन खान, मोहम्मद मुशाहिद उल इस्लाम अब्दुल माजीद, मोहम्मद सर्फराज अब्दुल हक उस्मानी, जमान नवाब खुटेउपाड, सलमान सिराजउद्दीन खान, फहाद मोहम्मद इस्तेयाक अन्सारी आणि तल्हा हासिफ पोतरीक यांच्याविरोधात एनआयएच्या विशेष न्यायालयात खटला दाखल केला होता. एटीएसने पकडलेल्या आरोपींपैकी एकजण अल्पवयीन होता. त्याच्याविरोधात एटीएसने बाल न्यायमंडळासमोर खटला भरला होता. सुनावणीत तो दोषी ठरल्याने न्यायमंडळाने त्याला तीन वर्षे विशेष निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती एटीएसचे पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांनी दिली.