रस्त्याच्या रेखांकनानुसार विजेचे खांब लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:04 AM2021-09-02T04:04:02+5:302021-09-02T04:04:02+5:30

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यानुसार शहरातील अनेक रस्ते रुंद झाले. मात्र, महावितरणचे विद्युत खांब आजही अनेक रस्त्यांच्या मध्यभागी उभे ...

Install electricity poles as per road drawing! | रस्त्याच्या रेखांकनानुसार विजेचे खांब लावा!

रस्त्याच्या रेखांकनानुसार विजेचे खांब लावा!

googlenewsNext

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यानुसार शहरातील अनेक रस्ते रुंद झाले. मात्र, महावितरणचे विद्युत खांब आजही अनेक रस्त्यांच्या मध्यभागी उभे असून ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. यापुढे कोणताही नवीन खांब लावताना किंवा जुना खांब आजूबाजूला हलविताना रेखांकनातील रस्ता किती रुंद आहे, हे बघूनच काम करावे, अशी सूचना मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी केली.

रस्त्यात अडथळा निर्माण करणारे खांब, डीपी स्थलांतरित करणे, हर्सूल घनकचरा प्रक्रिया केंद्रास वीज पुरवठा आदी विषयांवर पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली मनपात बैठक घेण्यात आली. या बैठकीत महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, प्रभारी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) लक्ष्मीकांत राजेली यांची उपस्थिती होती.

खांब आणि रोहित्र स्थलांतरित करण्याच्या कामास गती देण्यासाठी चार सदस्य समिती स्थापन करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले. समितीत महावितरणतर्फे कार्यकारी अभियंता शहर विभाग-१ महेश पाटील, शहर विभाग-२ प्रेमसिंग राजपूत, महानगरपालिकेतर्फे कार्यकारी अभियंता (विद्युत) ए. बी. देशमुख, उपअभियंता (विद्युत) मोहिनी गायकवाड यांचा समावेश राहील. समिती १५ दिवसात अहवाल सादर करेल. हर्सूल घनकचरा प्रक्रिया केंद्रास वीज पुरवठा करणेबाबत चर्चा करण्यात आली. प्रक्रिया केंद्राच्या बाजूला जागा उपलब्ध करून दिली तर एक उपकेंद्र उभारता येईल, अशी सूचना महावितरणतर्फे करण्यात आली.

बैठकीस शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Install electricity poles as per road drawing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.