प्रीपेड वीज मीटर बसवा, पण आधी शासकीय कार्यालयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:04 AM2021-07-21T04:04:57+5:302021-07-21T04:04:57+5:30
औरंगाबाद : घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडिंगच्या तक्रारींवर उपाय म्हणून औरंगाबादसह राज्यातील महानगरांत घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याचा ...
औरंगाबाद : घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडिंगच्या तक्रारींवर उपाय म्हणून औरंगाबादसह राज्यातील महानगरांत घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाइलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध होणार आहेत. मात्र, शासकीय कार्यालये, शासकीय निवासस्थानांची थकबाकी ही अधिक असते. त्यामुळे आधी शासकीय कार्यालये, शासकीय निवासस्थानांना हे मीटर बसविण्याचे मत जाणकरांनी व्यक्त केले आहे. स्मार्ट मीटरमुळे चुकीचे वीज बिल येणे, वापरापेक्षा अधिक रकमेचे बिल येणे अशा कटकटी, वादापासून मुक्तता होणार आहे.
आजघडीला वीज वापरल्यानंतर जवळपास ४५ ते ६० दिवसांनी महावितरणकडे बिल भरले जाते. अनेक ग्राहक वीज बिल वेळेवर भरत नाहीत. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण अधिक आहे. यात शासकीय कार्यालये एक पाऊल पुढे आहेत. परिणामी, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यापेक्षा वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा अधिक व्यस्त राहत आहे. अनेकदा महावितरण आणि शासकीय कार्यालयात वीजपुरवठा तोडण्यावरून धुसफुसही होते. त्यामुळे शासकीय कार्यालयांना हे प्रीपेट मीटर आधी बसविण्याचा सूर व्यक्त होत आहे.
अनेक ग्राहक वीज मीटरमध्ये फेरफार करून विजेची चोरी करतात. त्यातूनही महावितरणला तोटा सहन करावा लागतो. कोरोना काळात वाढीव वीज बिलाचा मुद्दा ऐरणीवर आला. परंतु वापरापेक्षा अधिक बिल आले, अशा तक्रारींचे प्रमाण महावितरणकडे अधिक आहे. ‘प्रीपेड मीटर’मुळे महावितरणबरोबर वीज ग्राहकांचीही डोकेदुखी कमी होणार आहे.
वीज ग्राहकांना भुर्दंड बसू नये
स्मार्ट मीटरचा महावितरणला अधिक फायदा आहे. कारण आता ४५ ते ६० दिवसांनंतर ग्राहकांकडून वीज बिल वसुली होते. परंतु प्रीपेड मीटरमध्ये बॅलन्स संपले की लगेच पैसे भरावे लागतील. घरगुती ग्राहकांना हे मीटर बसविले पाहिजे. पण आधी शासकीय कार्यालये, निवासस्थानांना हे मीटर बसविणे आवश्यक आहे. स्मार्ट मीटरचा आर्थिक भुर्दंड हा वीज ग्राहकांना बसता कामा नये. वीज वितरण कंपनीने ते बसवून दिले पाहिजे.
- हेमंत कापडीया, माजी ग्राहक प्रतिनिधी, वीज नियामक आयोग
----
सर्वांना फायदा
स्मार्ट मीटर हे सर्व तपासण्या होऊनच येईल. मोबाइलमध्ये ज्याप्रमाणे आधी रिचार्ज मारतो, त्यानंतर वापर होतो, तसाच या मीटरचा वापर करता येईल. ‘पोस्ट पेड’ची सुविधाही राहील. त्यात काही त्रुटी असेल तर ते नंतर समोर येईल. परंतु स्मार्ट मीटर ही सर्वांसाठी चांगले ठरतील. ग्राहकांसोबत ‘एसएमएस’च्या माध्यमातून वेळोवेळी संवाद होईल.
- राजेंद्र राठोड, सहसचिव, सर्बोडिनेट इंजिनीअर असोसिएशन
-----
स्मार्ट मीटरचा फायदा
स्मार्ट मीटरमुळे मोबाइलप्रमाणे पैसे भरून वीज वापरता येईल. चुकीचे, जास्तीचे वीज बिल येणार नाही. पण अनेकदा ग्राहकाकडे पैसे नसतील आणि बॅलन्स संपले तर अंधारात राहण्याची वेळ येऊ शकते.
- अरुण पिंपळे, वीज ग्राहक
------
- शहरात एकूण ३ लाख २८ हजार वीज ग्राहक
- २ लाख ८३ हजार घरगुती वीज ग्राहक