विमानतळावर एक्स बॅण्ड डॉप्लर रडार बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:02 AM2021-07-21T04:02:57+5:302021-07-21T04:02:57+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक्स बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यासाठी पृथ्वी व विज्ञान मंत्रालय आणि हवामानशास्त्र महासंचालकांना औरंगाबाद ...
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक्स बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यासाठी पृथ्वी व विज्ञान मंत्रालय आणि हवामानशास्त्र महासंचालकांना औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन - नागरी उड्डयन समितीचे अध्यक्ष तथा उद्योजक सुनीत कोठारी यांनी पत्र दिले आहे.
‘लोकमत’ने मागील काही दिवसांपासून ‘मराठवाडा रडारवर’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून विभागात हवामानाच्या अभ्यासकेंद्राचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वृत्तमालिकेची दखल घेत कोठारी यांनी संबंधित खाते आणि प्रशासकीय यंत्रणेला पत्र दिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, हवामानाच्या अंदाजानुसार विमानाचे सुरक्षित लँडिंगसाठी रडारचा अधिक वापर होईल. त्याचबरोबर पाऊस, वादळ, गारपीट, वाऱ्याची गती, चक्रीवादळाच्या अनुषंगाने हवामानाची अचूक माहिती मिळेल.
औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांसह ६४ हजार ६४५ चौरस किलोमीटर व्यासाच्या भौगोलिक क्षेत्रफळासाठी त्याचा उपयोग होईल. विभागातील पारंपरिक पिकांसह फळबाग शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळाल्यास निश्चित फायदा होईल. आयएमडीकडे सध्या असलेली उपकरणे अद्ययावत करण्याचीही विनंतीही कोठारी यांनी केली आहे.