अवघ्या वर्षभरात उद्यानात सुंदर गुलाबपुष्पांऐवजी कुरूप काटेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:15 PM2020-12-16T16:15:49+5:302020-12-16T16:19:08+5:30
गुलाब उद्यानाचे मात्र झाले वाळवंट
औरंगाबाद : केंद्रीय पर्यटन विभागाने राज्याच्या पर्यटन राजधानीत गुलाबपुष्प फुलवून शहराला सुंदरता व मोहकता देण्याचे पाहिलेले स्वप्न कद्रू व निष्काळजी महापालिकेने उधळून लावले. उटीच्या धर्तीवर मजनू हिलवर ३ एकरात रोझ गार्डन फुलविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला. गुलाबांच्या १३ जातींनी हे उद्यान बहरले; पण अवघ्या वर्षभरात उद्यानात सुंदर गुलाबपुष्पांऐवजी कुरूप काटेच दिसत आहेत.
मागील वर्षी जुलै महिन्यात नागरिकांसाठी उद्यान मोफत करण्यात आले. पहिल्याच दिवशी १,७७४ नागरिकांनी भेट दिली. उद्यानात उनाडांचा धुमाकूळ सुरू झाला. देशी पर्यटकांना उद्यानात पाय ठेवणेही अवघड झाले. अखेर चौथ्या दिवशीच मनपाने उद्यानाला कुलूप ठोकले. त्यानंतर उद्यान सुरू करण्यात आले नाही. ऐतिहासिक औरंगाबादेत दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. पर्यटकांना पाहण्यासाठी शहरात ऐतिहासिक पर्यटनस्थळे बरीच आहेत. सायंकाळी निवांत क्षण घालविण्यासाठी सुंदर रोझ गार्डनही असावे, अशी संकल्पना काही वर्षांपूर्वी पुढे आली. महापालिकेने केंद्रीय पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठविला.
केंद्र शासनाने तब्बल ३ कोटी रुपयांचे अनुदान दिले. या अनुदानातून गुलाबांच्या १४ पाकळ्यांमध्ये एक सुंदर उद्यान विकसित झाले. उद्यानात सोफिया, ग्लॅडर, समरस्नो, स्कें टिमेंटा, क्रिसमिया, क्लासिक अॅक्ट, शॉकिंगब्ल्यू, अलिंका, अशा १३ जातींची झाडे लावण्यात आली. मागील ९ महिन्यांत उद्यानाची बरीच वाताहत झाली. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून उच्च प्रतीची गुलाबाची कलमे आणण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने उद्यानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता रोझ गार्डनची रयाच गेली आहे. जिकडेतिकडे मोडतोड झाली. दिवे फोडण्यात आलेत. पाण्याचा हौद कोरडा पडला आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी झाला होता. त्यासाठीही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल केली नाही.
उद्यानाचा सांभाळ मनपाला करणे अशक्य
दारुडे, गोळ्यांची नशा करणारे गर्दुले रोझ गार्डनमध्ये धुडगूस घालत आहेत. खाजगी एजन्सी नियुक्त करून उद्यानाचा सांभाळ केल्यास पर्यटकांना उद्यानात आल्याचा अनुभूती येईल.
झाडांची कटिंग केलीय
थंडी सुरू होताच गुलाबाच्या झाडांची कटिंग केली जाते. साधारणपणे जानेवारी महिन्यात फुले येण्यास सुरुवात होईल. मार्च महिन्यापर्यंत वेगवेगळ्या झाडांना फुले येत असतात. उद्यानातील गुलाबाची झाडे वाळलेली नाहीत. त्यांना खत आणि पाणी देण्याचे काम सुरू आहे.
-विजय पाटील, उद्यान अधीक्षक