भोलानाथऐवजी कोविडनाथनेच दिली वर्षभराची सुटी; विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी झाली ‘बोअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 05:27 PM2021-03-16T17:27:03+5:302021-03-16T17:30:36+5:30

कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी दि. १५ मार्च २०२० पासून राज्यातील शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.

Instead of Bholanath, Covid nath gave year-round leave; students getting bored forced to leave | भोलानाथऐवजी कोविडनाथनेच दिली वर्षभराची सुटी; विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी झाली ‘बोअर’

भोलानाथऐवजी कोविडनाथनेच दिली वर्षभराची सुटी; विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी झाली ‘बोअर’

googlenewsNext
ठळक मुद्देशाळांना सुटी लागून उलटले चक्क वर्षसंकटापासून अनभिज्ञ असणाऱ्या निरागस बालकांनी सुटी जाहीर होताच आनंदोत्सव साजरा केला. आता मात्र ही वर्षभरापासून मिळालेली सक्तीची सुटी ‘बोअर’ झाली असल्याचे बालकांनी सांगितले.

औरंगाबाद : ‘भोलानाथ भोलानाथ खरे सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा?’ अशी विनवणी करणाऱ्या बालगाेपाळांना भोलानाथने तर काही सुटी दिली नाही. पण, हा चमत्कार कोविडनाथने करून दाखविला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना चक्क एक वर्षाची सुटी दिली. 

बरोबर एक वर्षापूर्वी कोरोनारूपी संकट वेगाने येऊ लागले होते. त्यामुळे दि. १४ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी दि. १५ मार्च २०२० पासून राज्यातील शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. कोरोना आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागताच इयत्ता ५ वीपासून पुढील वर्ग काही काळासाठी सुरू झाले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी काही दिवसांसाठी का असेना, शाळेत हजेरी लावली होती. पण, कोरोनाचा कहर थांबत नसल्याने पूर्व प्राथमिक वर्ग ते इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांची सुटी मात्र अजूनही संपलेली नाही. पुढील संकटापासून अनभिज्ञ असणाऱ्या निरागस बालकांनी सुटी जाहीर होताच आनंदोत्सव साजरा केला. पण, आता मात्र ही वर्षभरापासून मिळालेली सक्तीची सुटी ‘बोअर’ झाली असल्याचे बालकांनी सांगितले.

मुले सुरक्षित राहिली, हेच यश
ऑनलाइन शिक्षण मिळालेले आणि न मिळालेले असे विद्यार्थ्यांचे सरळ दोन गट पडले आहेत. ऑनलाइन शिक्षण फक्त ५०-५५ टक्के विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचले आहे, असा शिक्षण विभागाचा सर्व्हे आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा न मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांचे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, डोळ्यांचा त्रास, चिडचिडेपणा या आजारांच्या रूपात मानसिक आणि शारीरिक नुकसान झाले आहे. मुलांचा दिनक्रम पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. कलेचा कुंचला ऑनलाइन माध्यमातून घेऊन गुरुजी कला आणि व्यक्तिमत्त्त्व विकास घडवू शकत नाहीत. त्यासाठी शिक्षकांचा प्रत्यक्ष सहवासच आवश्यक असतो. यावर्षी सगळेच विद्यार्थी यापासून वंचित राहिले. तरीही महामारीच्या काळात मुले सुरक्षित राहिली, हेच यावर्षीचे मोठे यश आहे.
- एस. पी. जवळकर.शिक्षणतज्ज्ञ

पालकांना वाटतेय भीती
वर्षभराची सुटी संपून मुले जेव्हा शाळेत जातील, तेव्हा एकाग्रता, लिहिण्याचा सराव, शाळेत ६-७ तास एकाच जागी बसण्याची सवय, शाळेची शिस्त, अभ्यासाची सवय मुलांना राहिलेली नसेल. या सर्व गोष्टींची सवय करून अभ्यासात पुन्हा मन रमविणे, ही मुलांसाठी अतिशय अवघड गोष्ट ठरणार आहे, अशी भीती काही पालक व्यक्त करत आहेत. वर्षभराच्या सुटीमुळे आपली मुले ‘होमसिक’ झाली आहेत, असे मतही काही पालकांनी व्यक्त केले.

Web Title: Instead of Bholanath, Covid nath gave year-round leave; students getting bored forced to leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.