‘ब्रेथ अॅनालायझर’ऐवजी तोंडाचा वास घेऊन बस चालकास ‘क्लीन चिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 03:12 PM2019-09-04T15:12:14+5:302019-09-04T15:13:43+5:30
प्रवाशांनी अन्य बसची व्यवस्था करण्यास एसटी महामंडळाला भाग पाडले.
औरंगाबाद : औरंगाबादहून नाशिकला जाणाऱ्या शिवशाही बसच्या चालकाने मद्यपान केल्याच्या शंकेवरून मंगळवारी (दि.३) सायंकाळी प्रवाशांनी अन्य बसची व्यवस्था करण्यास एसटी महामंडळाला भाग पाडले.
मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता औरंगाबादहून रवाना झाल्यानंतर ही बस माळीवाडा येथे पोहोचत नाही तोच बस अतिशय हळू चालविण्यात येत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. प्रारंभी याकडे प्रवाशांनी दुर्लक्ष केले. मात्र, बसचालक अचानक ब्रेक दाबत होता, त्यातून अपघाताचे प्रसंग येत होते. चालकाने मद्यपान केल्याची शंका काही प्रवाशांना आली. काहींनी थेट एसटी महामंडळाच्या नियंत्रण कक्षाला यासंदर्भात माहिती दिली. प्रवाशांनी बस थांबवत बसमधून प्रवास करण्यास नकार दिला. याविषयी वैजापूर आगाराच्या अधिकाऱ्यांना माहिती प्राप्त झाली. वैजापूर येथे बस आल्यानंतर ती रद्द करून प्रवाशांची अन्य बसमध्ये व्यवस्था करण्यात आली. ‘ब्रेथ अॅनालायझर’ऐवजी या चालकाच्या मुखाचा वास घेऊन एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याने मद्यपान केलेले नसल्याची क्लीन चिट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वायफर होते बंद
याविषयी मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक एस. ए. शिंदे म्हणाले, चालकाने मद्यपान केल्याची तक्रार होती. त्यानुसार चालकाची तपासणी केली. प्रथमदर्शनी त्याने मद्यपान केलेले नसल्याचे दिसून आले. बसचे वायफर बंद होते. पाऊस पडत असल्याने बस हळू चालवीत होता.