इंग्रजीऐवजी जि. प. शाळांकडे वाढला पालकांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:19+5:302021-06-16T04:06:19+5:30
नाचनवेल : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंदच असल्या तरी जिल्हा परिषद शाळांचे नेटवर्क नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन ...
नाचनवेल : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंदच असल्या तरी जिल्हा परिषद शाळांचे नेटवर्क नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन उमेद व उत्साहाने कामाला लागल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन काळात झालेल्या शिक्षणाच्या वाताहातीनंतर पालकांच्या डोक्यातील इंग्रजीचे खूळ ओसरले असून, अनेकजण जिल्हा परिषद शाळांकडे वळत असल्याचे चित्र नाचनवेल परिसरात दिसत आहे.
नाचनवेल केंद्रातील तेवीस प्राथमिक व एक हायस्कूल अशा एकूण चोवीस जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सद्य:स्थितीत १८५० विद्यार्थी शिकत आहेत. आता या शाळांमध्ये नवीन प्रवेशांची लगबग सुरू आहे. तालुक्यातील पहिल्या दोन आयएसओ मानांकन प्राप्त प्रयोगशील शाळा नाचनवेल केंद्रात आहेत, तर महादेववाडीसारख्या छोट्या शाळांनीही शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेशामध्ये चांगली कामगिरी करीत दर्जेदार शिक्षणाचा परिचय दिला आहे. कोरोना कालावधीत ऑनलाईन अध्यापन व वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून पालकांशी साधलेल्या कनेक्टिव्हिटीमुळे जि. प. शाळांची पटसंख्या वाढल्याचे चित्र आहे. लॉकडाऊन काळात गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबतीत इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडताना दिसल्या. त्याचवेळी जि. प. शाळांचे नेटवर्क मात्र शिस्तबद्धपणे विविध उपक्रम राबवीत होते. याचा सकारात्मक परिणाम होऊन पालकांमध्ये सरकारी शाळांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. यामुळे आता अनेक गावांत लोकसहभागातून गुणवत्ता विकासाची चळवळ उभी राहिल्याचे दिसत आहे. १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असून, सर्व शाळांनी यापूर्वीच नवीन विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत येण्यास अवधी असला तरी शाळा मात्र चिमुकल्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.
कोट-
नाचनवेल केंद्रातील सर्व शाळांचे युनिट प्रभावीपणे काम करीत असून, पटसंख्या वाढत असल्याचे समाधान आहे. दर्जेदार शिक्षणासाठी आपल्या केंद्रात विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. स्वअध्ययन व गटकार्यासाठी शासनामार्फत सर्व शाळांना मराठी, गणित, इंग्रजी व विज्ञान पेट्या तसेच इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आलेले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व शाळा कटिबद्ध असून, पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निःसंकोचपणे जिल्हा परिषद शाळेत घ्यावा.
- डी. टी. शिंदे, केंद्रप्रमुख, नाचनवेल
फोटो कॅप्शन : नाचनवेल केंद्रात शाळांनी ‘जि. प. शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यावेळी केंद्रप्रमुख डी. टी. शिंदे, मुख्याध्यापक विलास गाडेकर, कमलाकर सुरडकर, प्रताप मेरठ, उदय पिंपळे, सविता चौधरी, आशा माळी, सोमिनाथ मानकापे उपस्थित होते.
140621\20210614_110704_1.jpg
नाचनवेल केंद्रात शाळांनी ‘जि.प.शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यावेळी केंद्रप्रमुख डी.टी. शिंदे, मुख्याध्यापक विलास गाडेकर, कमलाकर सुरडकर, प्रताप मेरठ, उदय पिंपळे, सविता चौधरी, आशा माळी, सोमिनाथ मानकापे उपस्थित होते.