‘हे राम’,“बुद्धम् शरणम् गच्छामी’ ऐवजी कर्णकर्कश सायरनने दडपतो जीव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:03 AM2021-04-21T04:03:27+5:302021-04-21T04:03:27+5:30
औरंगाबाद: अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथ वापरणे हे औरंगाबाद शहराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले होते. ‘हे राम’, ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’ हे स्वर ...
औरंगाबाद: अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथ वापरणे हे औरंगाबाद शहराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले होते. ‘हे राम’, ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’ हे स्वर कानी पडले की, जवळून अंत्ययात्रा जातेय, हे कोणताही औरंगाबादवासीय न पाहताही सांगत असे. आता चित्र बदलले असून स्वर्गरथाची जागा कर्णकर्कश सायरनच्या ॲम्ब्युलन्सने घेतली आहे. कोरोनाकाळात दुर्दैवाने बहुतांश अंत्ययात्रा ॲम्ब्युलन्समधून स्मशानात येत असून आता स्वर्गरथही रस्त्याच्या कडेला धूळ खात उभे आहेत. औरंगाबादेत अंत्ययात्रेत स्वर्गरथाचा वापर करण्यास जवळपास २० वर्षापूर्वी सुरुवात झाली. हा प्रयोग करणारे औरंगाबाद शहर राज्यातील पहिलेच असावे. पाहतापाहता स्वर्गरथाची संख्या ५० च्या घरात पोहोचली. या स्वर्गरथातून अंत्ययात्रा निघाली की , ‘तू अंतर्यामी सबका.... हे राम, हे राम’ हे गीत किंवा हरिहरनच्या आवाजातील “बुद्धम् शरणम् गच्छामी’ ही वंदना वाजविली जाते. हे चलन एवढे वाढले की, ही दोन्ही गीते जवळपास कोठेही ऐकू आली की , अंत्ययात्रा निघाली हे हमखास समजावे. परंतु या दोन्ही धार्मिक गीतांवर आता ॲम्ब्युलन्सच्या सायरनने मात केली आहे. शहरात दररोज ५० हून अधिक अंत्यविधी होत आहेत. त्यातील बहुतांश हे कोरोना बळी असल्याने हे मृतदेह रुग्णालयातून ॲम्ब्युलन्सने थेट स्मशानभूमीत आणले जातात. त्यामुळे घरातून अंत्ययात्रा निघणेही बंद झाले आहे. स्मशानात अंत्यविधीसाठी जागा मिळत नसताना रस्त्यावरील अंत्ययात्रा बंद झाल्या आहेत. आता कर्णकर्कश सायरन वाजवत जाणाऱ्या ॲम्ब्युलन्समधून अंत्ययात्रा चाललीय की, रुग्णाला नेले जात आहे, याचा काहीही अंदाज येत नाही. त्यामुळे सर्वच स्वर्गरथ रस्त्याच्या कडेला धूळ खात उभे दिसतात. महामारी असताना स्वर्गरथाची चाके थंडावल्याचे स्वर्गरथावरील वाहक चव्हाण यांनी सांगितले.
चौकट
आठ तासात अस्थी न्या...
शहरातील सर्वच प्रमुख स्मशानभूमीत सध्या मृतदेहांवर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. एकानंतर एक अंत्यसंस्कार होत असल्यामुळे शेडऐवजी बाहेर चिता रचल्या जात आहेत. तीही जागा अपुरी पडत असल्याने स्मशानजोगी मृताच्या नातेवाईकांना ८ तासात अस्थी घेऊन जाण्यास सांगत आहेत. मुकुंदवाडी स्मशानभूमीत मंगळवारी एका कोरोना रुग्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर स्मशानजोग्याने नातेवाईकांना सहा तासात अस्थी घेऊन जाण्याचे फर्मान सोडले. तुम्ही या, मी अस्थी थंड करून देतो, असेही तो म्हणाला. शेवटी नातेवाईकांनी विनवणी करून किमान २४ तास मागून घेतले. वेळेत आला नाही तर मी अस्थी जमा करून बाजूला काढून ठेवीन, असे सांगण्यासही तो विसरला नाही. यावरून स्मशानजोग्यावर आलेल्या कामाच्या लोडचा अंदाज येऊ शकतो.