कारभार स्वच्छ करण्याऐवजी छत्रपती संभाजीनगरातील 'ते' कार्यालय बंद करण्याचा प्रस्ताव

By विकास राऊत | Published: May 29, 2024 12:55 PM2024-05-29T12:55:07+5:302024-05-29T12:55:48+5:30

घोटाळ्यांचे माहेरघर असलेले मुद्रांक विभागातील ते कार्यालय बंद करण्याचा सह जिल्हा निबंधकांनी महानिरीक्षकांना पाठविला प्रस्ताव

Instead of cleaning up the affairs, the proposal to close down 'That' office in Chhatrapati Sambhaji Nagar | कारभार स्वच्छ करण्याऐवजी छत्रपती संभाजीनगरातील 'ते' कार्यालय बंद करण्याचा प्रस्ताव

कारभार स्वच्छ करण्याऐवजी छत्रपती संभाजीनगरातील 'ते' कार्यालय बंद करण्याचा प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांपासून विविध घोटाळ्यांच्या कारनाम्यांचे माहेरघर असलेले जिल्हा मुद्रांक विभागातील ५ क्रमांकाचे कार्यालय बंद करावे, असा प्रस्ताव जिल्हा मुद्रांक निबंधकांनी महानिरीक्षकांना पाठविला आहे.

कारभार स्वच्छ करण्याऐवजी बंद करण्याचा अफलातून प्रस्ताव सध्या प्रशासनात चर्चेचा विषय बनला आहे. नोंदणी विभागाच्या जिल्ह्यातील एकूण १३ कार्यालयांपैकी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ५ हे वादग्रस्त ठरले. या कार्यालयात प्रभारी पदभारही घेण्यास कोणी तयार होत नसल्याने हे कार्यालयच बंद करावे, असे प्रस्तावात म्हटले. महानिरीक्षकांनी प्रस्ताव मंजूर केल्यास कार्यालय बंद करून तेथील कर्मचारी इतरत्र जातील. कार्यालया अंतर्गत क्षेत्राच्या कामाचेही वर्गीकरण होईल. जिल्ह्यातील १३ पैकी केवळ २ दुय्यम निबंधक हे नियमित आहेत. बाकी ११ कार्यालयांचा पदभार प्रभारी आहे.

का वादग्रस्त झाले कार्यालय?
तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन, अब्दीमंडीतील विविध गटांच्या रजिस्ट्री रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरू ठेवून करणे, जागेचे मूल्य कमी दाखवून नोंदणी करणे, मुद्रांक शुल्क बुडविणे या व इतर अनेक मुद्द्यांसह कार्यालय क्र. ५ मधून बनावट एनएद्वारे अनेक दस्तांची नोंदणी केल्याच्या तक्रारी विभागीय आयुक्तांकडे गेल्या. त्यांनी २०१९ पासूनच्या सर्वच दस्तांची तपासणी करण्याचे आदेश महसूल आणि नोंदणी विभागाला दिले आहेत. हा सगळा प्रकार पाहता कार्यालयातील कर्मचारी विभागीय चौकशीच्या फेऱ्यात आले.

तीन महिन्यांपूर्वीच राजपूत यांचे निलंबन...
अब्दीमंडी शत्रू संपत्तीच्या दस्तांची नोंदणी रात्री उशिरापर्यंत केल्याने दुय्यम निबंधक गणेश राजपूत यांचे निलंबन करण्यात आले. याच कार्यालयात बनावट एनएद्वारे अनेक दस्तांची नोंदणी केल्याच्या तक्रारी आहेत. राजपूत यांच्या निलंबनानंतर या कार्यालयाचा पदभार वरिष्ठ लिपिक मधुकर क्षीरसागर यांच्याकडे दिला. त्यांच्या काळातही २३ कोटी रुपयांची जमीन ९ कोटींना दाखवून दस्त नोंदणी केली. यामध्ये तब्बल ८३ कोटींचा मुद्रांक शुल्क कमी घेतले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांच्या प्रभारी कार्यकाळातील संपूर्ण दस्तांची चौकशी करण्याचे निर्देश उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी दिले.

महानिरीक्षकांकडे प्रस्ताव
५ क्रमांकाचे कार्यालय बंद करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याने तेथील पदभार घेण्यास कुणीही तयार नाही. मध्यंतरी प्रभारी असलेेले दुय्यम निबंधक मधुकर क्षीरसागर यांनीही चुकीची दस्त नोंदणी केली. त्यांचा पदभार ३१ मे पर्यंत असेल, त्यानंतर काढून घेण्यात येईल. त्यांच्या काळातील दस्तनोंदणीची चौकशी होईल, त्यानंतर कारवाई होईल.
-विवेक गांगुर्डे, जिल्हा मुद्रांक अधिकारी

Web Title: Instead of cleaning up the affairs, the proposal to close down 'That' office in Chhatrapati Sambhaji Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.