धोकादायक कॅफे कल्चर; महाविद्यालयीन मुले-मुली दिसले आक्षेपार्ह अवस्थेत, तळमजला का?

By सुमित डोळे | Published: December 8, 2023 04:47 PM2023-12-08T16:47:25+5:302023-12-08T16:50:33+5:30

जबाबदारी कोणाची? शहरात ३०० पेक्षा अधिक कॅफे, ६० टक्क्यांची नोंदच नाही

Instead of college, boys and girls were seen in 'Cafe', not studies, in an offensive state | धोकादायक कॅफे कल्चर; महाविद्यालयीन मुले-मुली दिसले आक्षेपार्ह अवस्थेत, तळमजला का?

धोकादायक कॅफे कल्चर; महाविद्यालयीन मुले-मुली दिसले आक्षेपार्ह अवस्थेत, तळमजला का?

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठ वर्षांत शहरात वेगाने वाढलेले 'कॅफे कल्चर' पुन्हा एकदा गंभीररीत्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गुरुवारी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी ग्राहक म्हणून क्रांती चाैकातील कॅफ हॉलिडेमध्ये प्रवेश केला. तेव्हा अभ्यासाच्या नावाखाली घराबाहेर पडलेली १८ ते२० वयोगटातील मुले-मुली आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. कॅफेचालकाने खासगी क्षणांसाठी स्वतंत्र व्यवस्थाच उभी केल्याचे यात निदर्शनास आले. त्यानंतर कॅफेचालकासह तरुण, तरुणींना क्रांती चौक पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

या कॅफेबाबत अनेक दिवसांपासून स्थानिकांकडून पोलिसांकडे तक्रारी होत्या. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पाटील यांनी काही कर्मचाऱ्यांसह कॅफेकडे मोर्चा वळवला. सरकारी वाहन लांब उभे करून साध्या वेशात एकट्याने कॅफेत प्रवेश केला. कॅफेच्या सर्वसाधारण चित्राऐवजी आत धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. विशीतील तीन मुली, मुले अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत आढळली. सुरुवातीला त्यांना त्याबाबत विचारणा केल्यानंतर कॅफेचालकाने उलट प्रश्न विचारले. मात्र, समोर पोलिस उभे असल्याचे कळल्यावर मात्र सर्वांनाच घाम फुटला. सुरुवातीला अरेरावी करणाऱ्या कॅफेचालकाला पोलिसी खाक्या दाखवून ठाण्यात नेण्यात आले.

तळमजला कशासाठी ?
बाहेरून एका मजल्याच्या दिसणाऱ्या कॅफेच्या आत एक तळमजला आढळला. छोटे निळे लाईट्स व बाकी सर्व अंधार व छोट्या कपार्टमेंटसाठी स्वतंत्र दर आकारले जातात. कॅफेच्या कचरापेटीत आक्षेपार्ह गोष्टी आढळल्याचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले. मुला-मुलींच्या पालकांना देखील याबाबत काहीच कल्पना नव्हती. बोर्डावर पंकज ताठे म्हणून चालकाचे नाव नमूद आहे. सर्वांवर मुंबई पोलिस ॲक्ट अधिनियमांअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कारवाई केल्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी कारवाई
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन निरीक्षक गीता बागवडे यांनी उस्मानपुऱ्यात १० पेक्षा कॅफेंवर कारवाई केली होती. तेव्हादेखील तेथे असेच खासगी 'कंपार्टमेंट' आढळले होते. शहरात निराला बाजार, सर्व बड्या महाविद्यालयांचे परिसर, कॅनॉट प्लेस, उस्मानपुऱ्यात ३०० पेक्षा अधिक कॅफे आहेत. कॅनॉट प्लेसच्या अनेक कॅफेंत असेच प्रकार चालतात. अनेक कॅफेंची सरकारदरबारी नोंददेखील नसते. मात्र, कारवाईची जबाबदारी काेणीच घेत नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली.

Web Title: Instead of college, boys and girls were seen in 'Cafe', not studies, in an offensive state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.