झोपण्याऐवजी अपंगांनी मांडला ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 06:29 PM2017-08-01T18:29:36+5:302017-08-01T19:07:07+5:30
प्रहार अपंग क्रांती आंदोलन या अपंगांसाठी काम करणा-या संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ' झोपा काढो ' आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेत जमलेल्या अपंगांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला व घोषणाबाजी सुरू केली.
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. १ : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकारी- कर्मचा-यांनी अपंगांना विविध योजनांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिका-यांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन योजना मार्गी लावण्यासाठी यंदा कुचराई होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर हे आंदोलन लगेच समाप्त झाले.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन या अपंगांसाठी काम करणा-या संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ' झोपा काढो ' आंदोलन आयोजित केले होते. तथापि, या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे हे सकाळीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपंगांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांची व सुरक्षारक्षकासोबत शाब्दीक चकमक उडाली. तेव्हा झालेल्या धक्काबुक्कीत ते जखमी झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील आंदोलनात सहभागी होऊ शकले नाही. पूर्वनियोजिति या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेत जमलेल्या अपंगांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला व घोषणाबाजी सुरू केली.
अपंगांनी आंदोलन सुरू केले त्यावेळी नेमके मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड कामानिमित्त कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी पुढे आले. अपंगांच्या भावना त्यांनी जाणल्या व यंदा जिल्हा परिषदेमार्फत राबविण्याल्या जाणाºया सर्व योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण विभागाने घरकूल योजना, बीजभांडवल योजनांसाठी लाभार्थी अपंगांकडून प्रस्ताव मागविण्यात आल्याची आंदोलनकर्त्यांना माहिती अधिकाºयांनी दिली. समाजलकल्याण विभागामार्फत सव्वा कोटी रुपयांची तरतूद घरकूल योजनेसाठी केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी अपंगांच्या खात्यावर प्रत्येकी सव्वा लाख रुपये जमा केले जाणार आहेत..