‘शिवशाही’वर प्रशिक्षित चालक देण्याची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:53 PM2018-10-12T16:53:48+5:302018-10-12T17:16:02+5:30
शिवशाही बसवर प्रशिक्षित चालकच पाठविला गेला पाहिजे, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले.
औरंगाबाद : शिवशाही बस ही नवीन ब्रँड आहे. त्यावर प्रत्येकाचे लक्ष आहे. अपघात झाला तर तात्काळ माहिती मिळत असून, अपघाताचे प्रमाण काहीसे अधिक आहे. असे असले तरी बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. ‘एसटी’सह भाडेतत्त्वावरील शिवशाही बसच्या चालकांनाही प्रशिक्षण बंधनकारक आहे. शिवशाही बसवर प्रशिक्षित चालकच पाठविला गेला पाहिजे, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले.
जिल्ह्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेली एसटी महामंडळाची वातानुकूलित शिवशाही बस सोयीसुविधांबरोबर अपघातांमुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांत एकट्या औरंगाबाद विभागातील २२ बसचा अपघात झाला. यात ५ अपघात हे प्राणांतिक होते. एसटी महामंडळाची गुरुवारी मराठवाडास्तरीय त्रैमासिक आढावा बैठक झाली. या बैठकीत ‘एसटी’च्या विविध विषयांबरोबर शिवशाही बसच्या अपघातांच्या मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. शिवशाही बसच्या परिस्थितीविषयी देओल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, शिवशाही बस ही प्रामुख्याने लांब पल्ल्यावर धावते. या बस नवीन आहेत. काही अपघातांत चालकांमुळे ही बस रस्त्यांवरून खाली उतरली. बसच्या तुलनेत अधिक प्रशिक्षित चालक ठेवण्यास प्राधान्य दिले जात आहे. बसची तपासणीदेखील करण्यात आलेली आहे. त्यात कोणताही तांत्रिक दोष आढळून आलेला नाही, असे देओले म्हणाले.
देओले म्हणाले की, औरंगाबादेत शहर बससेवा सुरू केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित आहे. त्यामुळे ही सेवा सुरू करताना कोणावरही अतिरिक्त भार येणार नाही. शिवाय कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रियादेखील सुरू आहे.
खाजगी चालकांनाही बंधनकारक
शिवशाही बसच्या चालकांना प्रशिक्षण दिले आहे. त्याबरोबर आता पुन्हा प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण एखाद्या वर्गापेक्षा प्रत्यक्ष बसमध्ये दिले जात आहे. खाजगी बसचालकांनाही प्रशिक्षण बंधनकारक आहे. बसवर प्रशिक्षित चालकच गेला पाहिजे, यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आगामी कालावधीत अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा देओल यांनी व्यक्त केली.