सन्मान योजनेत वृद्ध महिलेचा अवमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:05 AM2021-02-16T04:05:41+5:302021-02-16T04:05:41+5:30
सोयगाव : शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे या उद्देशाने केंद्र सरकारने महत्वकांक्षी शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. मात्र या ...
सोयगाव : शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे या उद्देशाने केंद्र सरकारने महत्वकांक्षी शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. मात्र या सोवगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारने संचिकेवर फोटो नसल्याने एका ७१ वर्षीय विधवा महिलेची संचिका फेटाळली कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. विनंती करून सुद्धा साहेबांनी ऐकले नसल्याने आता काय करू असा प्रश्न वृद्धेस पडला. मात्र त्यांची कुणालाच जीव आली नाही.
वरठाण (ता.सोयगाव) येथील सुंदराबाई मोरे यांनी शेतकरी सन्मान याेजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने आवश्यक त्या कागदपत्राची जुळवाजुळवी करत संचिका तयार केली होती. त्यास मान्यता मिळावी म्हणून त्यांनी सोमवारी दुपारी सोयगाव तहसील कार्यालयातील संबंधित नायब तहसीलदारांच्या टेबलवर ठेवली. मात्र तुमची संचिका अपूर्ण असून त्यावर फोटो नाही म्हणून त्या वृद्धेस नायब तहसीलदार सुरे यांनी ते फेटाळली. या योजनेसाठी छायाचित्र आवश्यक नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्या कारणामुळे मोरे यांनी संचिका फेटाळून लावली असा प्रश्न उपस्थित नागरिकांतून विचारला जात होता.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शेतकरी सन्मान योजना अमलात आणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. सुंदराबाई मोरे या विधवा वृद्ध महिलेने योजनेसाठी संचिका ऑनलाईन करून दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात आल्या होत्या. परंतु नायब तहसीलदाराच्या या प्रतापामुळे योजनेचा लाभ तर दूरच उलटा या वृद्धेस मनस्ताप सहन करावा लागला. कारण वारंवार विंनती करून सुद्धा संबधित अधिकाऱ्यांनी ती संचिका दाखल करून घेतली नाही.
---- महसूल राज्यमंत्र्यांच्या निर्देशाला खो ----
तहसील कार्यालयात येणाऱ्यांना नागरिकांची कामे तातडीने करण्यासाठी जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे. यासह त्यांना नागरिकांना विनाकारण वेठीस धरू नये असे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसापूर्वीच सोयगावात झालेल्या आढावा बैठकीत दिले होते. यादरम्यान त्यांनी तक्रारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. मात्र पुन्हा जैेसे थे परिस्थिती कार्यालयात असल्याचे सोमवारी दिसून आले.