आंतरजातीय विवाहितांचे अनुदान पुन्हा रखडले, राज्यासाठी हवेत शंभर कोटी

By स. सो. खंडाळकर | Published: October 14, 2023 03:31 PM2023-10-14T15:31:34+5:302023-10-14T15:34:47+5:30

केंद्र शासनाचा ५० टक्के वाटा वेळेवर मिळत नसल्याने अनुदानाची प्रकरणे कोरोना काळापासून रखडली आहेत.

Inter-caste marriage subsidy stopped again, hundred crores in the air for the state | आंतरजातीय विवाहितांचे अनुदान पुन्हा रखडले, राज्यासाठी हवेत शंभर कोटी

आंतरजातीय विवाहितांचे अनुदान पुन्हा रखडले, राज्यासाठी हवेत शंभर कोटी

छत्रपती संभाजीनगर : शासनातर्फे मिळणारे आंतरजातीय विवाहितांचे अनुदान पुन्हा रखडले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण १६० पैकी मध्यंतरी काहीच प्रस्ताव निकाली काढण्यात आले. निधीअभावी बरेचसे जोडपे अनुदानाच्या प्रतीक्षेत समाजकल्याण कार्यालयात चकरा मारीत आहेत.

आता हा प्रश्न राज्याचाच बनला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी एकूण शंभर कोटी रुपये लागणार आहेत. त्यातला केंद्र शासनाचा ५० टक्के वाटा वेळेवर मिळत नसल्याने अनुदानाची प्रकरणे कोरोना काळापासून रखडली आहेत. केंद्र सरकारच्या अनुदानाची वाट न पाहता राज्य सरकारच हा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रस्ताव वित्त विभागाकडे आहे, असे समाजकल्याण सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले. तर समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया म्हणाले, या महिन्याच्या अखेरपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी वरपर्यंत करण्यात आली आहे. तो कधी उपलब्ध होईल, याकडे आंतरजातीय जोडप्यांचे लक्ष लागलेले आहे. लवकरात लवकर हा निधी उपलब्ध न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा बडगा उचलावा लागेल, असा इशारा अनेक आंतरजातीय जोडप्यांनी दिला आहे. कोरोना काळापासूनचे हे प्रस्ताव आहेत. आम्ही चकरा मारून थकलो आहोत. निधी नाही, एवढेच उत्तर ऐकावे लागते, अशी तक्रार आंतरजातीय विवाहित संघटना- बाबा दळवी विचार मंचतर्फे सूरज जाधव व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Inter-caste marriage subsidy stopped again, hundred crores in the air for the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.