शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले
By विजय सरवदे | Published: September 1, 2022 05:09 PM2022-09-01T17:09:07+5:302022-09-01T17:10:34+5:30
राज्यात तब्बल ३ हजार ९४३ शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या असून यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७० शिक्षकांचा समावेश आहे.
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदली झालेल्या १७० पैकी तीन शिक्षकांनी बनवेगिरी केल्याचे निष्पन्न झाले असून ७ शिक्षकांना पदावनत करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले आहे. या गुरूजींच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी करून त्यांना ५ सप्टेंबरच्या अगोदर कार्यमुक्त करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
२४ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी राज्यातील जि.प. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश निघाले. राज्यात तब्बल ३ हजार ९४३ शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या असून यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७० शिक्षकांचा समावेश आहे.
तथापि, बदली झालेल्या शिक्षकांपैकी दोन शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज करताना जातीचा चुकीचा प्रवर्ग नमूद केला होता, तर एकाने एनओसी नसतानाही अर्ज भरला होता. उर्वरित ७ जण हे पदवीधर शिक्षक आहेत. बदलीच्या शासन आदेशानुसार बदलीने जाताना स्वखुशीने पदोन्नतीचे लाभ सोडावे लागतात. बदली झालेल्या ७ शिक्षकांनी अद्याप पदावनतीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केलेले नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १६० शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.