अवचट यांच्याशी संवाद; नितांतसुंदर मैफलीचा खळाळता अनुभव
By Admin | Published: October 17, 2014 11:36 PM2014-10-17T23:36:30+5:302014-10-17T23:55:53+5:30
औरंगाबाद : डॉ. अनिल अवचट या बहुआयामी अवलियाच्या अंगातील नाना कळा अनुभवताना रसिकही मंत्रमुग्ध झाले.
औरंगाबाद : एखाद्या शाळकरी मुलाच्या भाबडेपणाने ओरिगामीच्या कागदी वस्तूंची प्रात्यक्षिके दाखवताना हरखलेले, सहज साध्या शैलीत चित्रे काढताना रेषांमध्ये रमलेले, हाती बासरी घेत ती वाजवताना हरवलेले, मध्येच डायरी काढून कविता वाचणारे, तारुण्यात अनुभवलेल्या बिहारच्या दुष्काळाविषयी बोलताना भावुक झालेले, अशा डॉ. अनिल अवचट या बहुआयामी अवलियाच्या अंगातील नाना कळा अनुभवताना रसिकही मंत्रमुग्ध झाले.
जागतिक भूलशास्त्र दिनाचे औचित्य साधत इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉ. अवचट यांची प्रकट मुलाखत आयोजित केली होती. भूलतज्ज्ञ डॉ. सुहास जेवळीकर यांनी त्यांना बोलते करीत दिलखुलास संवाद साधला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. योगिनी पत्की यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी सूर्यवंशी यांनी आभार मानले.
डॉ. अवचट यांनी ओतूर या आपल्या गावाच्या जिव्हाळ्याच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, रूढ शिक्षण पद्धतीने आणि त्यानुसार चालणाऱ्या शाळेने मला न्यूनगंड दिला; पण पुढे ओरिगामी, बासरीवादन, गायन, चित्रकला अशा विविध छंदांकडे वळल्याचे अवचट यांनी सांगितले. सजग समाजभान दाखवत घडलेला कार्यकर्ता आणि लेखक असा स्वत:चा प्रवास मांडताना त्यांनी ज्येष्ठ समाजवादी एस.एम. जोशी व हमाल पंचायतीचे प्रणेते डॉ. बाबा आढाव यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रमाला शिकत असताना बिहारच्या दुष्काळात काम करताना जयप्रकाश नारायण, भूमी मुक्ती आंदोलनात एसेम व ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीत डॉ. बाबा आढाव यांनी भोवताली पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. मला खरोखर सर्जन व्हायचेय का, असा प्रश्न मला पडला आणि विचारांती मी सामाजिक कार्याकडे वळलो. या सगळ्या प्रवासात सर्वार्थाने सहचारिणी बनून साथ देणाऱ्या सुनंदातार्इंविषयी बोलताना अवचटांनी मनाचा एक हळवा कप्पा उघडला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या उभारणीपासून कर्करोगग्रस्त झाल्यावरही अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असणाऱ्या डॉ. सुनंदा अवचट यांच्या आठवणी सांगताना एका सुंदर, समर्पित सहजीवनाचे दर्शन त्यांनी घडवले.