भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:13 AM2017-11-04T01:13:27+5:302017-11-04T01:13:43+5:30
कामासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री करणा-या एका रॅके टचा ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कामासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री करणा-या एका रॅके टचा ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. रॅॅकेटमधील दोन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या शेतक-यांना विक्री केलेले १७ ट्रॅक्टर आणि एक कार असा सुमारे ७४ लाखांचा ऐवज जप्त केला.
शेख अन्वर शेख मुसा (रा. हुसेननगर, सातारा) आणि देवीलाल सरदारसिंग राजपूत (रा. पांगरा, ता. कन्नड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग म्हणाले की, पिसादेवी येथील रहिवासी भगवान विष्णू वायाळ यांनी चिकलठाणा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांचे ट्रॅक्टर आरोपी शेख अन्वर आणि शेख इब्राहीम ऊर्फ शेख इस्माईल यांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर भाड्याने नेले आणि नंतर ते परस्पर गायब केले, तर अशाच प्रकारची दुसरी तक्रार कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात बळीराम साहेबराव राठोड (रा. आंबा तांडा, कन्नड) यांनी नोंदविली होती. यावरून आरोपी शेख शकील शेख शब्बीर (रा. श्रीराम कॉलनी, कन्नड), देवीलाल सरदारसिंग राजपूत (रा. पांगरा, ता. कन्नड) आणि नासेर शेख रसूल शेख (रा. मोमीनपुरा, कन्नड) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. कन्नड पोलीस आणि ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखा पोलिसांनी शेख अन्वर यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच भगवान यांचा ट्रॅक्टर त्याने त्याचा साथीदार देवीलाल राजपूत याने विविध ठिकाणी विक्री केल्याची क बुली दिली. नंतर कन्नड पोलिसांनी देवीलाल यास पकडले. यानंतर दोन्ही पोलिसांनी संयुक्त तपास केला. या तपासात दोन्ही आरोपींनी सांगितले की, आरोपी हे स्वत:ला मोठा कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून ट्रॅक्टरमालकाचा विश्वास संपादन करीत. चालक आमचा असेल आणि इंधनही आम्हीच टाकू तुम्ही केवळ ट्रॅक्टर द्या, आम्ही तुम्हाला दरमहा भाडे देत राहू, असे सांगून विश्वास संपादन करीत. बहुतेक ट्रॅक्टरवर कर्जाचा बोजा असतो. कर्जाचे हप्ते परतफे ड होईल या आशेपोटी आरोपींकडे ट्रॅक्टर सुपूर्द करीत. यानंतर आरोपी ट्रॅक्टरची बनावट कागदपत्रे तयार करून ते विविध जिल्ह्यांत विक्री करीत.