‘समृद्धी’वरून प्रवासासाठी औरंगाबादकरांसाठी पाच ठिकाणी इंटरचेंज; जाणून घ्या कुठून घेणार वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 04:49 PM2021-03-02T16:49:58+5:302021-03-02T16:57:50+5:30

सध्या औरंगाबाद किंवा जालना जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी अहमदनगर मार्गे किंवा नाशिक मार्गे जावे लागते.

Interchange at five places for Aurangabadkars to travel on ‘Samrudhi’; Find out where to turn | ‘समृद्धी’वरून प्रवासासाठी औरंगाबादकरांसाठी पाच ठिकाणी इंटरचेंज; जाणून घ्या कुठून घेणार वळण

‘समृद्धी’वरून प्रवासासाठी औरंगाबादकरांसाठी पाच ठिकाणी इंटरचेंज; जाणून घ्या कुठून घेणार वळण

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर-मुंबई मार्गे औरंगाबाद प्रवास अधिक वेगवान होणार पहिल्या टप्प्यात शिर्डीपर्यंत प्रवास करता येईल

औरंगाबाद : मुंबई अथवा नागपूरपर्यंत कमी वेळेत व आरामदायी प्रवासासाठी समृद्धी महामार्ग हा औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. औरंगाबाद शहर व लगतच्या परिसरातील नागरिकांना या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी तीन ठिकाणी, तर गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील नागरिकांसाठी दोन ठिकाणी, असे जिल्ह्यात पाच ‘इंटरचेंज’ तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.

सध्या औरंगाबाद किंवा जालना जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी अहमदनगर मार्गे किंवा नाशिक मार्गे जावे लागते. या दोन्ही मार्गाने मुंबईला पोहोचण्यासाठी किमान ६ ते ७ तासांचा अवधी लागतो. मात्र, यापुढे समृद्धी महामार्गावरून मुंबईला अवघ्या चार तासांतच पोहोचता येईल. औरंगाबादहून नागपूरला पोहोचण्यासाठी आता किमान ९ ते १० तास लागतात. समृद्धी महामार्गावरून ६ ते ७ तासांत नागपूरला पोहोचणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आपली वाहने समृद्धी महामार्गावर कोठून ही नेता येणार नाहीत. त्यासाठी शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी महामार्गावर चढण्यासाठी अथवा खाली उतरण्यासाठी ‘इंटरचेंज’ तयार केले जात आहेत. या पाचही ‘इंटरचेंज’च्या ठिकाणी टोलनाका उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाच टोलनाके असले, तरी एकाच ठिकाणी फास्टॅगच्या माध्यमातून वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे.

दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग गेला असून, तो जमिनीपासून उंचावर आहे. या महामार्गालगतची गावे किंवा अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या गावांना जोडणारे रस्ते, ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग, राज्य अथवा राष्ट्रीय मार्ग आदींसाठी जिल्ह्यात १२० ठिकाणी ‘अंडरपास’ (महामार्गाखालून गेलेला रस्ता) व फक्त दोनच ठिकाणी ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत.

‘समृद्धी’चा वापर कोणाला कोठून करता येईल
- नागपूरकडे जाण्यासाठी सिडको, चिकलठाणा व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील वाहनधारकांना शेंद्रालगत जयपूर इंटरचेंजवरून जाता येईल. याच इंटरचेंजवरून चिकलठाणा व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील वाहनधारकांना मुंबईकडे जाणे सोपे होईल.
- सिडको व लगतच्या परिसरातील वाहनधारकांना सावंगी येथील इंटरचेंज हा मुंबईकडे जाण्यासाठी सोईस्कर राहील.
- जुने औरंगाबाद शहर, रेल्वे स्टेशन, छावणी, पडेगाव या परिसरातील वाहनधारकांना मुंबईला जाण्यासाठी माळीवाडा इंटरचेंज परवडणारा आहे.
- गंगापूर व तालुक्यातील वाहनधारकांना हडस पिंपळगाव, तर वैजापूर व तालुक्यातील वाहनधारकांना जांबरगाव इंटरचेंज सोईस्कर राहणार आहे.

Web Title: Interchange at five places for Aurangabadkars to travel on ‘Samrudhi’; Find out where to turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.