महिलांना उद्योगासाठी चार टक्के दराने व्याज; अर्ज केला का?
By विजय सरवदे | Published: February 29, 2024 06:20 PM2024-02-29T18:20:32+5:302024-02-29T18:20:45+5:30
महिला समृद्धी कर्ज योजना : बचत गटातील महिला उद्योजक लाभार्थी
छत्रपती संभाजीनगर : बचत गटांच्या महिलांना व्यावसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून ‘महिला समृद्धी कर्ज योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अल्प व्याजदराने ५ लाखांपासून जास्तीत जास्त २० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त बचत गटांच्या महिलांनी सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करायचे आहेत.
बचत गटातील मागासवर्गीय महिला उद्योजकच या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. महिलांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन देण्याचा या योजनेचा हेतू आहे. योजनेंतर्गत कर्जाची परतफेड कालावधी हा तीन वर्षांचा आहे.
१) काय आहे महिला समृद्धी योजना?
मागासवर्गीय अथवा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला बचत गटांंना व्यावसाय किंवा उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून महिलांसाठी महिला समृद्धी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिला व्यावसायिकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील मागासवर्गीय महिलांना आर्थिक मदत दिली जाते.
२) चार टक्के दराने मिळते कर्ज
महिला समृद्धी कर्ज योजनेंतर्गत उद्योग, व्यावसाय सुरू करण्यासाठी लाभार्थी महिला बचत गटांना ४ टक्के व्याज दराने ५ लाखांपासून जास्तीत जास्त २० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.
३) निकष काय?
लाभार्थी हा मागासवर्गीय अथवा अनुसूचित जातीचा असावा. महिला लाभार्थ्यांचे किमान वय १८ ते ५० वर्षांपर्यंत असावे, लाभार्थी बीपीएल श्रेणीतील असावेत, अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी ९८ हजारांपर्यंत, तर शहरी भागासाठी १ लाख २० हजारांपर्यंत असावे.
४) कागदपत्रे काय लागतात?
या कर्ज योजनेसाठी लाभार्थीचे जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी पुरावा (वीजबिल किंवा रेशनकार्ड), मतदार ओळखपत्र, बचत गटाचे ओळखपत्र आदी कागदपत्रे गरजेची आहेत.
सूचना प्राप्त झालेल्या नाहीत
बचत गटांच्या महिलांना कर्ज वाटपाची महिला समृद्धी योजना ही योजनेविषयी अद्याप जिल्हा समाज कल्याण कार्यालयास सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, असे या कार्यालयांच्या सूत्रांनी सांगितले आहे.