थकीत मालमत्ताकरावरील व्याज, दंड माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:05 AM2021-05-29T04:05:26+5:302021-05-29T04:05:26+5:30
औरंगाबाद : थकीत मालमत्ता करावर महापालिका तब्बल २४ टक्के व्याज व २ टक्क्यांपर्यंत दंड आकारत आहे. सावकारापेक्षा अधिक लावण्यात ...
औरंगाबाद : थकीत मालमत्ता करावर महापालिका तब्बल २४ टक्के व्याज व २ टक्क्यांपर्यंत दंड आकारत आहे. सावकारापेक्षा अधिक लावण्यात येणारे व्याज व दंड संपूर्णपणे माफ करण्यात यावेत, अशी मागणी मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊनमुळे ६० टक्के दुकाने बंद आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत व्यापारी महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास व्यापारी तयार आहेत, असे त्यांनी नमूद केले. मात्र, मनपा थकीत मालमत्ता करावर २४ टक्के व्याज व २ टक्के दंड अशी २६ टक्के व्याज दंड आकारते. एवढेच नव्हे, तर डिसेंबरनंतर चालू बाकीवरही व्याज, दंड आकारला जातो, हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. बँकाही एवढे व्याजदर व दंड आकारात नाही. सावकारापेक्षा जास्त व्याज, दंड आकारले जात असल्याने, व्यापारी या वसुलीस विरोध करत आहेत. मनपाने मागील मालमत्ता कर थकबाकी व चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करावर संपूर्ण व्याज व दंड माफ करावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात येत आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. याची दखल घेतली गेली नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.