अंतर्गत रस्ते चकाचक; बाहेर पडण्यासाठी कसरत; ईटखेडा, नाथपुरम अन् कांचनवाडीतील परिस्थिती

By राम शिनगारे | Published: February 19, 2024 07:04 PM2024-02-19T19:04:17+5:302024-02-19T19:04:25+5:30

एक दिवस एक वसाहत: एकाच रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा

internal roads ready; outwards having hurdels; Situation in Etkheda, Nathpuram and Kanchanwadi | अंतर्गत रस्ते चकाचक; बाहेर पडण्यासाठी कसरत; ईटखेडा, नाथपुरम अन् कांचनवाडीतील परिस्थिती

अंतर्गत रस्ते चकाचक; बाहेर पडण्यासाठी कसरत; ईटखेडा, नाथपुरम अन् कांचनवाडीतील परिस्थिती

छत्रपती संभाजीनगर : गगनाला भिडलेले जमिनीचे भाव... सर्वत्र अंतर्गत सिमेंटचे रस्ते... महापालिकेच्या इतरही सुविधा नियमित मिळणाऱ्या २० हजारांपेक्षा अधिकच्या लोकसंख्या असलेल्या भागाला मुख्य रस्ता असलेल्या पैठण रोडवर येण्यासाठी फक्त एकाच रस्त्याचा वापर करावा लागत आहे. या रस्त्यावरूनच अनधिकृत वाळू वाहतूक करणारे टिप्पर जातात. त्याशिवाय शाळांच्या स्कूल बस, विद्यापीठात येणाऱ्या गाड्यांसह रहिवाशांच्या गाड्यांची प्रचंड वर्दळ असते. त्यातच दोन्ही बाजूंनी त्या रस्त्यावरच अतिक्रमण केल्यामुळे अगदी जीव मुठीत घेऊन चालकांना वाहन घेऊन जावे लागत असल्याचे 'लोकमत'च्या पाहणीत आढळून आले.

कांचनवाडी, नाथपुरम आणि इटखेडा परिसरात शहरातील महत्त्वाच्या नाथ व्हॅली स्कूल, अग्रसेन विद्या मंदिर, वुड्रीज हायस्कूल, रेयान इंटरनॅशनल, रिर्व्हरडेल, राजे संभाजी भोसले सैनिकी विद्यालयासह महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ याच परिसरात आहे. त्यामुळे शैक्षणिक स्कूल बससह इतर गाड्यांची दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. ही सर्व वाहतूक नाथ व्हॅली रस्त्यावरून होते. या भागात येण्यासाठी दुसरा एक ६७ व्हिलाज हा रस्ता वापरला जातो. तो रस्ताही ५० फुटांचा आहे. मात्र, प्रत्यक्षात २५ फूटच अस्तित्वात आहे. त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे वाहतूक कमी असते. वुड्रीज शाळेच्या समाेरून ३३ फुटांचा रस्ता आहे. हा रस्ता फक्त एका ठिकाणी अडविल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून तो रस्ता पूर्ण होत नाही. तसेच फोर्टिन ग्रीन बंगलो ते पैठण रोड हा एकूण ८० फुटांचा रस्ता मंजूर आहे. हा रस्ता नुकताच अर्ध्यापर्यंत पूर्ण करण्यात येत आहे. मात्र, पैठण रोडपर्यंत होण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात अडथळे आहेत. ते दूर झाल्याशिवाय रस्ता पूर्ण होणार नाही. २० हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या इटखेडा, नाथपुरम आणि अर्ध्या कांचनवाडीतील नियोजित रस्ते पैठण रोडपर्यंत पूर्ण केल्यास हजारो नागरिकांची सोय होणार आहे. मात्र, महापालिका प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याचेही समोर आले आहे.

डीपी रस्ते कागदावर राहू नयेत
विकास योजनेतील (डीपी) रस्ते फक्त कागदावरच राहू नयेत. या भागातील अंतर्गत रस्ते केले आहेत. आता डीपी रस्त्यांसाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. हा निधी त्या भागातील उत्पन्नानुसार राखीव ठेवला पाहिजे. एकदा नकाशावर डीपी रस्ता आल्यास तो रद्द होत नाही. एक वेळ जागेचे आरक्षण बदलेल, पण डीपी रस्ता बदलत नाही. त्यामुळे या रस्त्यांच्या विकासाचा महापालिकेकडे कालबद्ध कार्यक्रम असला पाहिजे.
-नंदकुमार घोडेले, माजी महापाैर

महापालिकेने पुढाकार घ्यावा
नियोजित रस्त्यांमध्ये काही तांत्रिक अडथळे निर्माण झालेले आहेत. ते अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. संबंधित जागा मालकांना मोबदला देण्याचे धोरण ठरवून नियोजित रस्ते तत्काळ पूर्ण करावेत. त्याचा २० हजारांपेक्षा अधिकच्या नागरिकांना फायदा होईल.
-शिवाजी एरंडे, सरचिटणीस, नाथपूरम हौसिंग सोसायटी, इटखेडा

वाहतुकीची गर्दी अन् धुळीचे साम्राज्य
नाथ व्हॅली ते कांचनवाडी रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड गर्दी असते. त्यात अवजड वाहनांची ये-जा असल्यामुळे रस्त्यावरून नागरिकांना चालणे कठीण बनले आहे. रस्त्याला फुटपाथ नाही. वाहनांच्या वर्दळीमुळे बाजूच्या परिसरात धुळीचे साम्राज्य असते. इतर रस्ते झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल.
-ज्योती जाधव, रहिवासी, कांचनवाडी

शिवरस्ता झालाच पाहिजे
मागील अनेक वर्षांपासून शिवरस्ता होत नाही. खुल्या असलेल्या जागेवर समस्या आहे. मात्र, महापालिका त्यातून मार्ग काढू शकते. हा रस्ता झाल्यास नागरिकांना मोठी मदत होणार आहे.
-अमोल औटी, रहिवासी, एकदंत व्हिला

रस्त्यांचा विकास महत्त्वाचा
नाथपूरम, ईटखेडा परिसरातील डेव्हलपमेंट प्लॅनमधील मुख्य रस्ते किरकाेळ कारणांवरून रखडले आहेत. हे रस्ते झाले पाहिजेत. त्याशिवाय डीपी प्लॅनमुळे या भागातील अनेक ठिकाणी नळ, ड्रेनेजची जोडणी मिळत नाही. ही जोडणी महापालिकेने तत्काळ केली पाहिजे.
-सुदाम मुळे पाटील, व्यावसायिक, नाथपूरम

Web Title: internal roads ready; outwards having hurdels; Situation in Etkheda, Nathpuram and Kanchanwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.