अंतर्गत जलवाहिनीचे काम दर्जाहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:09 AM2017-08-15T00:09:21+5:302017-08-15T00:09:21+5:30

सव्वाशे कोटी रुपये खर्चाचे अंतर्गत जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. निकृष्ट पद्धतीने होत असलेल्या या कामाची गुणवत्ता न तपासताच पालिक ा प्रशासन कोट्यवधींचे देयके काढत असल्याचा आरोप नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

Internal waterproofing work is notorious | अंतर्गत जलवाहिनीचे काम दर्जाहीन

अंतर्गत जलवाहिनीचे काम दर्जाहीन

googlenewsNext

सर्वसाधारण सभेत आरोप : गुणवत्तापूर्ण कामासाठी समिती हवी
जालना : शहरात सव्वाशे कोटी रुपये खर्चाचे अंतर्गत जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. निकृष्ट पद्धतीने होत असलेल्या या कामाची गुणवत्ता न तपासताच पालिक ा प्रशासन कोट्यवधींचे देयके काढत असल्याचा आरोप नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. जलवाहिनीच्या गुणवत्तापूर्ण कामासाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मागणीही सदस्यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभागृहात उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर व पालिका सदस्यांची उपस्थिती होती.
शहरात अंथरण्यात येत असलेल्या अंतर्गत जलवाहिनीच्या कामावर सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. सेनेचे विरोधी गटनेते विष्णू पाचफुले, भाजपचे भास्कर दानवे म्हणाले, की जलवाहिनीसाठी शहरात चुकीच्या पद्धतीने खोदकाम सुरू आहे. झोननिहाय काम पूर्ण करून चाचणी घेणे आवश्यक असताना एजन्सीने बहुतांश ठिकाणी अर्धवट कामे केली आहेत. काही ठिकाणी जुन्या जलवाहिनीमध्ये जोडण्या केल्या जात आहे. तरीही एजन्सीला २४ कोटींची देयके देण्यात आली. बाला परदेशी यांनी जलवाहिनीच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी नियुक्त पुण्याच्या फोरट्रेस एजन्सीचा मुद्दा उपस्थित केला. ११० किलोमीटर काम झालेले असताना या एजन्सीकडून एकदाही गुणवत्तेची तपासली नाही. बोगस काम सुरू असताना एकूण बिलाच्या दोन टक्के रक्कम फोरट्रेस एजन्सीला कशी देता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहराच्या भविष्यासाठी जलवाहिनीचे काम चांगल्या पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जावी. समितीने झोननिहाय कामाची तपासणी केल्यानंतरच एजन्सीचे बील मंजूर करावे, अशी मागणी अशोक पांगारकर, रावसाहेब राऊत शशिकांत घुगे, चंपालाल भगत, ज्ञानेश्वर ढोबळे आदींनी केली. मंगळबाजारात जागा असतानाही एजन्सीकडून जलकुंभ उभारणीस विलंब केला जात असल्याचा मुद्दा आरेफ खान, रमेश गौरक्षक यांनी उपस्थित केला. विकास कामांसाठी भाजप-सेनेच्या सदस्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी सदस्य रफिया बेगम यांनी केली. विशिष्ट प्रभागातच विकास कामे सुरू असून, कामांचे वाटप करताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शहाआलम खान यांनी केला. एनआरएचएम अंतर्गत शहरासाठी चार हेल्थ सेंटर मंजूर आहेत. यासाठीचा सर्व खर्च शासन करणार आहे. पालिकेने जागा न दिल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, असे लोहार म्हणाले. कुंडलिका नदीचे खोलीकरण व स्वच्छतेचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. त्यामुळे विषय पत्रिकेवरील चार क्रमांकाचा कुंडलिकेच्या स्वच्छतेचा ठराव घेण्याची गरज नसल्याच्या मुद्याकडे भास्कर दानवे व शशिकांत घुगे यांनी लक्ष वेधले. सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी स्पष्टीकरण दिले.

Web Title: Internal waterproofing work is notorious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.