सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा मिलाफ; माजी अभिनेत्री मयुरी कांगो गूगलमध्ये आहे इंडस्ट्री हेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 08:04 PM2021-03-08T20:04:37+5:302021-03-08T20:05:14+5:30
International Women's Day : अभिनयाच्या माध्यमातून दाखविलेली कला आणि करिअरमध्ये गाठलेल्या उंचीमधून दिसलेली बुद्धिमत्ता अशा मयुरी कांगो म्हणजे कला, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट मिलाफ.
औरंगाबाद : 'घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही...' या गाण्यात जेव्हा ती मोठ्या पडद्यावर दिसली, तेव्हाच खरे तर औरंगाबादकरांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. पण यापेक्षाही मोठे यश तिने मिळविले आणि जागतिक स्तरावर औरंगाबादची पताका फडकावली. गूगलमध्ये इंडस्ट्री हेड असलेल्या मयुरी कांगो यांचा औरंगाबादकरांना अभिमान आहे.
अभिनयाच्या माध्यमातून दाखविलेली कला आणि करिअरमध्ये गाठलेल्या उंचीमधून दिसलेली बुद्धिमत्ता अशा मयुरी कांगो म्हणजे कला, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट मिलाफ. सेंट झेविअर्स, सेंट फ्रान्सिस येथून शालेय शिक्षण आणि देवगिरी महाविद्यालयातून पुढील शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. २००५ साली एमबीए करण्यासाठी न्यूयॉर्कला गेल्या. तिथे त्यांच्या वर्गात देश- विदेशातून आलेल्या प्रत्येकालाच कमित कमी १० वर्षांचा कामाचा अनुभव होता. कामाचा कोणताही अनुभव नसलेल्या मयुरी या एकमेव असल्याने सुरुवातीचे ३ ते ४ महिने खूपच अवघड गेले. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ, हा आत्मविश्वास होता. पण कामाच्या अनुभवाचे करायचे काय, असा प्रश्न पडला. म्हणूनच मग त्यांनी शिक्षण घेत नोकरी करायला सुरुवात केेली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यूयॉर्क येथील एका अग्रणी ॲडव्हरटायझिंग एजन्सीमध्ये त्या काम करू लागल्या. अवघ्या ८ वर्षातच कंपनीच्या सिनिअर डायरेक्टर झाल्या. अनेक मोठेमोठे प्रोजेक्ट त्यांनी अचूक पद्धतीने हाताळले. करिअरमध्ये एक उंची गाठत मयुरी सध्या गूगलमध्ये इंडस्ट्री हेड म्हणून कार्यरत आहेत.
मिसिंग औरंगाबाद :
औरंगाबादमध्ये माझे बालपण खूप छान गेले. सायकलवर, सनीवर आम्ही मित्रमैत्रिणी मिळून खूप फिरायचो. खूप सुरक्षित शहर होते. दौलताबाद, वेरूळ अगदी जवळच असल्याने कायम भटकंती करायचो. तिथले लोक आणि आमची भटकंती खूप मिस करते, असे मयुरी म्हणाल्या.
संधी मिळवावी लागते
कोणीही तुमच्या समोर संधी घेऊन उभे राहत नाही. तुम्हाला ती मिळवावी लागते. मिडल मॅनेजमेंटमध्ये आज खूप महिला आहेत. पण वरिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या महिलांची संख्या अजूनही कमी आहे. हे प्रमाण बदलणे मयुरी यांना गरजेचे वाटते.