International Yoga Day 2018 : सोशल मीडियातून एकत्र येत गाण्यातून सांगितले योगाचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 08:27 PM2018-06-21T20:27:39+5:302018-06-21T20:32:58+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या काही तरुणांनी जागतिक योग दिनानिमित्त गाणे तयार केले असून, जागतिक योगदिनाच्या पार्श्वभूमीवर ते सोशल मीडियावरच लाँच केले.
औरंगाबाद : सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या काही तरुणांनी जागतिक योग दिनानिमित्त गाणे तयार केले असून, जागतिक योगदिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २०) ते सोशल मीडियावर लाँच केले. योगाचे महत्त्व सांगणारे हे गाणे सोशल मीडियावर सध्या लोकप्रिय होत आहे. लाँचिंगनंतर त्याला अनेक हिट्स मिळाले.
औरंगाबादचे प्रणव कुलकर्णी हे या गाण्याचे गीतकार आहेत. संगीतकार अनिश सुतार हे पुण्याचे आहेत. गायिका अनुष्का आपटे, तन्वी इनामदार, अंतरा कुलकर्णी या बेळगाव आणि पुण्याच्या असून, गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण बेळगाव येथील शाळेत झाले आहे. तसेच काही चित्रीकरण औरंगाबाद आणि मुंबईत देखील झाले आहे. ‘महाशक्ती का सपना होगा अब हमसे साकार, चलो चले अब इसी पल करे योग शक्ती की पुकार..’ या गाण्यातून कुलकर्णी यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. जास्तीत जास्त लोकांना गाणे कळावे म्हणून ते हिंदी भाषेत रचण्यात आले आहे.
आजच्या गतिमान जगात टिकून राहण्यासाठी आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्यासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे. गाण्याच्या माध्यमातून हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, या उद्देशाने या गाण्याची निर्मिती केल्याचे संगीतकार अनिश यांनी सांगितले. या गाण्याचे गीतकार, संगीतकार तसेच गायक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. सोशल मीडियावर अनेकदा टीका होत असताना त्याचा असाही सदुपयोग होऊ शकतो, हे या तरुणांनी या उपक्रमाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.