Aurangabad Violence : औरंगाबादमध्ये दक्षतेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:45 PM2018-05-12T13:45:56+5:302018-05-12T13:46:51+5:30
शहरात रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल सोशल मिडीयावरून अफवा पसरू नये म्हणून आज सकाळपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.
औरंगाबाद : शहरात रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल सोशल मिडीयावरून अफवा पसरू नये म्हणून आज सकाळपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. मोठ्याप्रमाणावर झालेल्या हिंसाचारामागे किरकोळ कारण असले तरी याबाबत सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरून इतर ठिकाणी हिंसाचार पसरू नये म्हणून पोलिसांकडून ही दक्षता घेण्यात आली आहे.
शुक्रवार मध्यरात्रीपासून शहरातील मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजार भागात तणाव होता. यातून झालेल्या हिंसाचाराने अचानक रोद्रूप धारण केले. यातून रात्रभर या भागात जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिसांच्या माहितीनुसार हिंसाचारामागे किरकोळ कारण होते मात्र जमाव आक्रमक झाल्याने मोठ्याप्रमाणावर हिंसाचार झाला. यामागे सोशल मिडियामधून पसरविण्यात आलेल्या अफवांचा मोठा हात असल्याचा संशय आहे.
यादरम्यान शहराच्या इतर भागात शांतता होती. आज सकाळी याबाबत सोशल उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. हिंसाचाराचे फोटो, माहिती, बातम्या व्हायरल झाल्या. यामाध्यमातून परत एकदा शहरात अफवा पसरून इतर ठिकाणी याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून पोलिसांनी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.
सध्या हिंसाचार झालेल्या भागात शांतता असून येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पोलिसांची मोठी कुमकही या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. हिंसाचार भडकला तो अफवांमुळे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका असे पोलीस प्रशासना व लोकप्रतिनिधींकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
Internet services suspended in #Maharashtra's Aurangabad after clash between two groups last night. Section 144 (prohibits assembly of more than 4 people in an area) has been imposed in the city.
— ANI (@ANI) May 12, 2018