चौका-चौकात कारंजे, व्हर्टिकल गार्डन; शहर सौंदर्यात भर टाकण्यासाठी महापालिकेची ठोस पावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 02:24 PM2022-05-02T14:24:36+5:302022-05-02T14:36:50+5:30

महापालिकेला १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून होणार कामे

Intersection fountain, vertical garden; Aurangabad Municipal Corporation's concrete steps to enhance the beauty of the city | चौका-चौकात कारंजे, व्हर्टिकल गार्डन; शहर सौंदर्यात भर टाकण्यासाठी महापालिकेची ठोस पावले

चौका-चौकात कारंजे, व्हर्टिकल गार्डन; शहर सौंदर्यात भर टाकण्यासाठी महापालिकेची ठोस पावले

googlenewsNext

औरंगाबाद : शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरात चौका-चौकात पाण्याचे कारंजे, व्हर्टिकल गार्डन, उद्यानात कारंजे उभारण्यात येणार आहेत. या कामांवर जवळपास साडेपाच कोटी रुपये खर्च केले जाणार असून, या कामांच्या निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

सध्या महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. शहरातील अंतर्गत १११ रस्त्यांची कामे लवकरच सुरू केली जाणार आहेत. त्याकरिता स्मार्ट सिटीतून ३१७ कोटी रुपयांचा निधी खर्च होत आहे. त्यासोबतच रस्त्यावरील दुभाजक, वृक्ष लागवड, साफसफाई ही कामेसुद्धा हाती घेण्यात आली आहेत. महापालिकेला १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून शहरात ठिकठिकाणी व्हर्टिकल गार्डन तयार केल्या जाणार असून, उद्याने आणि चौकांमध्ये कारंजे उभारून त्यांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. उद्यान विभागाकडून व्हर्टिकल गार्डन, कारंजे यासाठी निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत.

पाच ठिकाणी व्हर्टिकल गार्डन
नाल्यांमध्ये कचरा टाकू नये म्हणून लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवरच व्हर्टिकल गार्डन तयार करण्याची संकल्पना प्रशासक पाण्डेय यांनी अस्तित्वात आणली. मध्यवर्ती बसस्थानकासमोर व्हर्टिकल गार्डन बनविण्यात आल्या असून, त्याच धर्तीवर बाबा पेट्रोल पंपाच्या महावीर चौक उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी तसेच कर्णपुरा यात्रेकडून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी, नागेश्वरवाडी नाल्यावर, औरंगपुरा भाजी मंडई, सिडकोतील वसंतराव नाईक उड्डाणपुलाखाली चौकात आणि समोरील भागात व्हर्टिकल गार्डन तयार केली जाणार आहे. व्हर्टिकल गार्डनसाठी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

आठ चौकांत कारंजे
दमडी महल चौक, जुना मोंढा निजामकालीन कारंजे, सिडकोतील पिरॅमिड चौक, दिल्लीगेटच्या समोर (पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन), कलाग्रामसमोरील रस्त्यावर, महावीर चौक, सिडकोतील वसंतराव नाईक उड्डाणपुलाखाली, शहानूरमियाँ दर्गा चौक या कामांवर २.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

उद्यानातील कारंजे दुरुस्ती
महापालिकेच्या विविध उद्यानांमध्येही कारंजे आहेत. परंतु, ते चालू स्थितीत नसल्यामुळे त्यांची दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे. त्यामध्ये सिद्धार्थ उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान, सलीम अली सरोवरासमोरील, ज्योतीनगर उद्यानात कारंजे दुरुस्तीवर १.९९ कोटी रुपये खर्च होतील.

Web Title: Intersection fountain, vertical garden; Aurangabad Municipal Corporation's concrete steps to enhance the beauty of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.