परीक्षेच्या कामात व्यवस्थापन परिषद सदस्याचा हस्तक्षेप?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:02 PM2019-01-03T23:02:49+5:302019-01-03T23:03:21+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा भवनमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात येत आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलपरीक्षा भवनमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. याठिकाणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनी गुरुवारी अनधिकृतपणे भेट दिल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना परीक्षा भवनतर्फे देण्यात आली, तर उत्तरपत्रिका तपासणीच्या ठिकाणी अनोळखी लोक काम करीत आहेत. त्यांची माहिती घेण्यासाठी मूल्यांकन संचालकांच्या कार्यालयात गेलो असल्याचा दावा डॉ. अंभोरे यांनी केला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा भवनमध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि व्यवस्थापनशास्त्र या अभ्यासक्रमांच्या परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याचे अनेक वेळा उघडकीस आले आहे. यावर्षी किरकोळ घटना वगळता अभियांत्रिकीच्या परीक्षा विनागोंधळ पार पडल्या आहेत. सध्या परीक्षा भवनमध्ये असलेल्या मूल्यांकन केंद्रात उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम सुरू आहे. या केंद्रात गुरुवारी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अंभोरे यांनी भेट दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकार नसताना डॉ. अंभोरे यांनी मूल्यांकन केंद्राची पाहणी करीत कर्मचाऱ्यांची माहिती विचारली. हा सर्व विभाग गोपनीय आहे. त्याठिकाणी परवानगीशिवाय कोणालाही जाण्यास बंदी आहे. हा नियमांचा भंग असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. याविषयी डॉ. अंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी परीक्षा भवनमध्ये एका बैठकीच्या निमित्ताने गेलो होतो. बैठक संपल्यानंतर अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र मूल्यांकन केंद्राच्या संचालकांची भेट घेतली. त्यांच्याकडून मूल्यांकनात काम करणाºयांची नावे घेतली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोपनीय विभागात कार्यरत असलेले कार्मचारी विद्यापीठाच्या परिचयाचेसुद्धा नसल्याचे पाहणीत समोर आले. दहावी पास विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांसारख्या महत्त्वाच्या कामासाठी नेमले असल्याचे दिसून आले. याविषयी कुलगुरूंकडे शुक्रवारी सविस्तर तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोट,
मला याविषयी काहीही बोलायचे नाही. ज्यांनी भेट दिली त्यांनाच विचारा. घटनेची सविस्तर माहिती कुलगुरूंना दिली आहे. त्यांनाच यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
- डॉ. जयश्री सूर्यवंशी, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ