दारूच्या नशेत वडिलांचा गळा दाबला,तिघा भावांनी मिळून त्याचा जीव घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 07:35 PM2022-03-22T19:35:50+5:302022-03-22T19:38:14+5:30
सिडको पोलिसांनी संशयित चार आरोपींना अटक केली आहे
औरंगाबाद : दारूच्या नशेत शिवीगाळ करीत वडिलांचा गळा दाबणाऱ्याचा भावांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता मिसारवाडी येथे घडली. याविषयी माहिती मिळताच सिडको पोलिसांनी झटपट कारवाई करीत चार संशयितांना अटक केली. सुनील प्रभुदास पारधे, मनोज प्रभुदास पारधे, सागर प्रभुदास पारधे आणि प्रभुदास पारधे (सर्व रा. मिसारवाडी, गल्ली क्रमांक १) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रभुदास हा अन्य आरोपींचा पिता आहे. या घटनेत सलीम शहा मुस्तफा शहा (३०) यांचा खून झाला.
सिडको पोलिसांनी सांगितले की, या सर्वांची घरे मिसारवाडी येथील एकाच गल्लीत शेजारी आहेत. सलीमला दारूचे व्यसन असल्याने तो नशेत गल्लीतील लोकांना शिवीगाळ करीत असे. चार दिवसांपूर्वी त्याने प्रभुदास यांना शिवीगाळ केली होती. याकडे प्रभुदास यांच्या मुलांनी दुर्लक्ष केले होते. काल मात्र सलीम प्रभुदासच्या अंगावर धावून गेला आणि त्याने त्यांचा गळा दाबला. हे भांडण आजूबाजूच्यांनी सोडविले होते. ही बाब मुलांना समजल्याने ते त्याला जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा सलीम पत्नीसोबत ओट्यावर गप्पा मारीत होता.
आरोपींनी त्याला बोलावून घरापासून जवळच असलेल्या संघर्ष चौकात ओढत नेले. तेथे त्याला चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व तो बेशुद्ध पडल्यावर आरोपी पळून गेले. याविषयी माहिती मिळताच सलीमचे भाऊ नाझिम मुस्तफा शहा (वय २८, रा. मिसारवाडी) यांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत एमजीएम हॉस्पिटलला नेले. तेथील डॉक्टरांनी सलीमला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी पवार आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ एमजीएम आणि घटनास्थळी धाव घेतली. नाझिम शहा यांची फिर्याद नोंदवून घेत आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदविला.
झटपट कारवाई; आरोपींना अटक
पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर झटपट कारवाई करत पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले.