नशेखोर तरूणाने घेतला मुक्या प्राण्याचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:32+5:302020-12-11T04:21:32+5:30
बुधवार ९ रोजी सायंकाळी पाणचक्की परिसरात काही लहान मुले खेळत होती. परिसरातील एका कुटुंबाचे कुत्रेही याच परिसरात होते. ...
बुधवार ९ रोजी सायंकाळी पाणचक्की परिसरात काही लहान मुले खेळत होती. परिसरातील एका कुटुंबाचे कुत्रेही याच परिसरात होते. त्याचवेळी १९ वर्षीय यश बदके हा तरूण दारू पिऊन तिथे आला आणि त्याच्या जवळचा चाकू काढून आता हा चाकू कुणाला मारू, असे मुलांना विचारू लागला. पुढच्या काही वेळातच त्याने तो चाकू शेजारी बसलेल्या कुत्रीला फेकून मारला आणि तिचा निर्दयीपणे जीव घेतला.
ही घटना मुलांनी लगेचच कुत्रीच्या मालकाला जाऊन सांगितली असता त्यांनी तत्काळ छावणी पोलीस ठाण्यात सदर तरूणाविरूद्ध तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविल्याचे समजताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
चौकट :
कलम ४२९ अंतर्गत गुन्हा
तक्रार नोंदविल्यानंतर आरोपीच्या घरच्या लोकांच्या भितीमुळे कुत्रीचे मालक तक्रार मागे घेण्याच्या विचारात होते. परंतु औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या सदस्यांनी त्यांना या प्रकरणी खंबीर साथ देत तक्रार मागे न घेण्याचे सुचविले. जीव गमावलेली कुत्री गरोदर होती, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. तरूणावर कलम ४२९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे असोसिएशनच्या अध्यक्षा बेरील सँचिस यांनी सांगितले. कलम ४२९ अंतर्गत पाळीव प्राण्याचा जीव घेणे, मारहाण करणे, छेडछाड करणे हा गुन्हा असून याअंतर्गत आरोपीला ५ वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते. फोटो ओळ :
चाकूच्या हल्ल्यात जीव गमवावा लागलेली कुत्री