औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 04:56 PM2018-12-01T16:56:26+5:302018-12-01T16:59:17+5:30

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिकेचे उपायुक्त वसंत निकम आणि उपअभियंता ए. बी. देशमुख यांची कसून चौकशी केली.

Investigation by Aurangabad Municipal Corporation's Economic Offenses Wing Branch | औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देटीडीआर घोटाळा प्रकरण आणखी दोघांची होणार चौकशी

औरंगाबाद : महापालिकेतील कथित टीडीआर घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिकेचे उपायुक्त वसंत निकम आणि उपअभियंता ए. बी. देशमुख यांची कसून चौकशी केली. या दोन्ही अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांचे म्हणणे तपास अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतले. उर्वरित एक अधिकारी आणि कारकुनाला चौकशीसाठी शनिवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२०१६ साली महापालिकेतील टीडीआर घोटाळा उघडकीस आला होता. तत्कालीन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासमोर हा घोटाळा येताच त्यांनी याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिटीचौक ठाण्यात दोन तर जिन्सी ठाण्यात एक गुन्हा नोंद झाला होता. सिटीचौक ठाण्यात मनपाचे उपअभियंता पाठक यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. 

आरोपीने सादर केलेल्या प्रस्तावावर संंबंधित विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांची काय भूमिका होती, त्यांनी टीडीआर फाईलवर काय शेरा मारला, याविषयी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तीन अधिकारी आणि एका कारकुनाला  नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार शुक्रवारी उपायुक्त वसंत निकम आणि उपअभियंता ए. बी. देशमुख हे चौकशीसाठी बुधवारी तपास अधिकारी श्रीकांत नवले यांच्यासमोर हजर झाले. 

या दोन्ही अधिकाऱ्यांची शुक्रवारी चौकशी करण्यात आली. तसेच शाखा अभियंता एस. बी. राठोड आणि नगररचना विभागातील आवक- जावक विभागाचा कारकून मझहर यांना चौकशीसाठी शनिवारी बोलावण्यात आल्याची माहिती निरीक्षक नवले यांनी दिली.

एकाच  मालमत्तेचा दोनदा मोबदला
या तपासात टीडीआरसाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर करणारे  तत्कालीन नगरसेवक अब्दुल सिकंदर साजेद शेख याचे वडील दिवंगत साजीद बिल्डर यांनी मनपाकडून बाधित मालमत्तेचा मोबदला घेतलेला होता. हे आरोपी अब्दुल सिकंदर यास माहीत होते. असे असताना त्याने पुन्हा त्याच मालमत्तेचा मोबदला म्हणून टीडीआरची मनपाकडे मागणी केली होती. याप्रकरणी निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या पथकाने २६ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालयातील एका झेरॉक्स सेंटरवरून अब्दुल सिकंदरला अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली होती. 

Web Title: Investigation by Aurangabad Municipal Corporation's Economic Offenses Wing Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.