हजारो लोकांना गंडविणाऱ्या हिरा कंपनीचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:40 PM2018-11-24T22:40:32+5:302018-11-24T22:43:17+5:30
औरंगाबाद : गुंतवणुकीच्या रकमेवर मोठा परतावा देण्याच्या आमिषाने हजारो लोकांना गंडविणाऱ्या हिरा ग्रुप आणि हिरा गोल्ड कंपनीविरोधात सिटीचौक ठाण्यात दाखल झालेला गुन्हा आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.
औरंगाबाद : गुंतवणुकीच्या रकमेवर मोठा परतावा देण्याच्या आमिषाने हजारो लोकांना गंडविणाऱ्या हिरा ग्रुप आणि हिरा गोल्ड कंपनीविरोधात सिटीचौक ठाण्यात दाखल झालेला गुन्हा आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. त्यानुसार शनिवारी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शहरातील पाच महिला गुंतवणूकदारांची हिरा कंपनीने ८ लाख ८५ हजार रुपयांना फसवणूक केली आहे. कंपनीची सीईओ नौहिरा शेख सध्या ठाणे पोलिसांच्या कोठडीत असून, लवकरच तिला औरंगाबाद पोलीस अटक करणार आहे.
पानदरिबा बोहरी कठडा येथील रहिवासी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार हिरा ग्रुप आॅफ कंपनी ही २००४-२००५ पासून औरंगाबादेतील जुना बाजार भागात कार्यान्वित आहे़ या कंपनीने गुंतवणुकीवर तीन टक्के व्याज दरमहा बँकेत जमा होईल, अशी योजना सुरू केली होती़ जुनी कंपनी असल्यामुळे आणि अनेकांच्या बँकेच्या खात्यावर पैसे जमा होत असल्यामुळे पानदरिबा येथील महिलेनेही १ लाख रुपयांची हिरा ग्रुपमध्ये गुंतवूणक केली. कंपनीच्या सीईओ नौहिरा शेख (रा. हैदराबाद) असून, तिने व्याजाच्या बदल्यात सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखविले होते.
सुरुवातीला काही दिवस गुंतवणूकदारांना परतावा दिल्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढली होती. जून २०१८ पासून परतावा देणे कंपनीने बंद केल्याने राज्यातील अनेक ठिकाणी कंपनीविरोधात गुन्हे नोंद झाले.
औरंगाबादेतील सिटीचौक पोलीस ठाण्यात निलोफर फातेमा काझी वहिदोद्दीन,सय्यद अब्दुल वहाव , सय्यद मेहरूख फातेमा, मसरत फातेमा आणि अन्य एक महिला यांची एकूण ८ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. हा गुन्हा तपासासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शनिवारी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग क रण्यात आला. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले तपास करीत आहे.