बालकाच्या हत्येचा तपास लागेना..!
By Admin | Published: February 21, 2017 10:56 PM2017-02-21T22:56:55+5:302017-02-21T22:59:10+5:30
कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील सहा वर्षीय बालकाच्या निर्घृण खून प्रकरणाला जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला आहे़
कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील सहा वर्षीय बालकाच्या निर्घृण खून प्रकरणाला जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला आहे़ इतका वेळ उलटूनही पोलिसांना या हत्येमागचे सूत्रधार पकडण्यात यश आलेले नसल्याने सदर घटनेचा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी होत आहे़
पिंपळगाव (डोळा) येथील सहा वर्षीय बालक कृष्णा इंगोले याची २५ जानेवारी रोजी हत्या करण्यात आली होती़ हा प्रकार अंधश्रध्देतून झाला असावा, हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे़ या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाजवळ हत्यार म्हणून वापरलेल रूमणे जप्त केले आहे़ त्याच परिसरात काही दिवसांनी कृष्णाची चप्पलही पोलिसांना आढळून आली होती़ या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीचे स्केच जारी केले होते़ काहीना तपासासाठी ताब्यात घेऊन चौकशी केली़ मूळचे पिंपळगाव (डोळा) येथील व सध्या पुणे येथे वास्तव्याला असलेल्या एका दाम्पत्यासह एका बुवाला पोलिसांनी अटक केले होते़ मात्र, त्यांच्याकडूनही फारसे काही हाती लागले नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी काही जणांची कळंब पोलीस ठाण्यात मॅरेथॉन चौकशी केली़ परंतू त्यामधूनही काही निष्पन्न न झाल्याने कृष्णाची हत्या अजूनही गूढच बनली आहे़ अंधश्रध्देतून हा प्रकार घडला असावा, याच दिशेने सध्या पोलिसांचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे़ विशेष म्हणजे कळंब पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे़ एकाही यंत्रणेला या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता आलेले नाही़ त्यामुळे हा तपास आता प्रभावी यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी होत आहे़
या सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्येनंतर पिंपळगाव परिसरात अजूनही भितीचे वातावरण आहे़ वाडी-वस्त्यावर राहणाऱ्यांमध्ये त्यांच्या लहान मुलांसाठी काळजी व्यक्त केली जात आहे़ पोलीस यंत्रणा कृष्णाची हत्या करणाऱ्यांना जेरबंद करण्यात अयशस्वी ठरली आहे़ कृष्णा ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेतील मुलांसह पालकामंध्येही भितीचे वातावरण असून, कृष्णाचे काय झाले ? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ (वार्ताहर)