औरंगाबादमध्ये गुन्हे शाखा व एटीएस पथक घेताहेत निर्वासितांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:46 PM2018-03-28T13:46:20+5:302018-03-28T13:49:47+5:30
प्रतिबंधित देशातील लोकांची घुसखोरी शहरात करून कोणी वास्तव्यास आले आहे काय, हे शोधण्यासाठी गुन्हे शाखा व एटीएस कर्मचारी मिळून ९ पथके शहरात चाचपणीच्या कामाला मंगळवारपासून लागले आहेत.
औरंगाबाद : प्रतिबंधित देशातील लोकांची घुसखोरी शहरात करून कोणी वास्तव्यास आले आहे काय, हे शोधण्यासाठी गुन्हे शाखा व एटीएस कर्मचारी मिळून ९ पथके शहरात चाचपणीच्या कामाला मंगळवारपासून लागले आहेत.
देशातील महत्त्वाच्या शहरांत एक कमांडर आणि त्याच्या तुकडीतील अतिरेकी वास्तव्य करीत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या गुप्तहेर विभागाने दिली आहे़ त्या शहराच्या यादीत औरंगाबादचा उल्लेख असल्याने वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरिकांच्या शोधासाठी ९ पथकांची स्थापना केली आहे़ या पथकात गुन्हे शाखेसह एटीएसचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़ त्यात ९ एपीआय, नऊ फौजदार आणि ३६ कर्मचारी असे ५४ जणांचा समावेश आहे़ देशातील संवेदनशील ठिकाणांची रेकी (पाहणी) करणारी ‘अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) ही दहशतवादी संघटना देशाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नुकत्याच पुणे, महाड, अंबरनाथमध्ये केलेल्या कारवाईत एटीबीचे सदस्य असणार्या पाच बांगलादेशींना अटक केली होती.
अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणार्या एटीबीच्या लक्ष्यस्थानी धार्मिक आणि पर्यटनस्थळांसह लष्कराचे तळही असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. पकडलेल्या संशयितांकडे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचा नकाशा आढळून आला आहे़ शिवाय एटीएसने पकडलेल्या संशयितांनी औरंगाबादेत तब्बल एका दिवसात १३ कॉल केल्याचे समोर आले आहे़ ते कॉल करण्यात आलेले नंबर आता बंद आहेत़ त्यामुळे एटीएस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़ त्या आदेशाप्रमाणे बांगलादेशींच्या शोधमोहिमेसाठी एटीएस आणि गुन्हे शाखेचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे़ यासाठी नऊ पथके तैनात करण्यात आली असून, त्या एका पथकात एक अधिकारी, चार कर्मचारी असा समावेश आहे. असा दुजोरा गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिला.